अनामत रक्कम न भरल्यास अभियंत्यांच्या शिफारसी रद्द ; जिल्हा परिषदेचा इशारा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्‍यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना बांधकामाच्या विविध कामांच्या शिफारसी देण्यात आल्या आहेत, मात्र ज्यांनी कामापोटी जिल्हा परिषदेला भरावयाची सुरक्षा अनामत रक्कम अद्यापपर्यंत भरलेली नाही, त्यांनी सुरक्षा अनामत रक्कम शुक्रवार, १४ फेब्रुवारीपर्यंत न भरल्यास त्यांच्या शिफारसी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांनी दिला आहे.

गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात जिल्हा वार्षिक योजना खर्च आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह इतर अधिकारी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मार्च अखेरपर्यंत पूर्ण होणारी कामे, अपूर्ण कामांवर झालेला खर्च व त्यांची सद्यस्थिती याबाबतचा आढावा घेतला. तसेच, अपूर्ण असलेली कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात सर्व विभाग प्रमुखांनी सुरू असलेल्या कामांना भेटी देणे व ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात पाऊले उचलणे, पूर्ण झालेल्या कामांची २८ मार्चपर्यंत बिले अदा झाली पाहिजेत, पूर्ण झालेल्या कामांची देयके अदा करण्यास लागणारा विलंब लक्षात घेता देयके अदायगी वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना देताना सांगितले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामांसंदर्भात शिफारशी देण्यात आल्या आहेत, मात्र त्यांनी अद्यापपर्यंत अनामत रक्कम भरलेली नाही व कामे देखील सुरू झालेली नाहीत, अशा शिफारशी धारक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी १४ फेब्रुवारीपर्यंत सुरक्षा अनामत रक्कम न भरल्यास शिफारशी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा या बैठकीत दिला.

पूर्ण झालेल्या कामांची बिले कोणत्याही परिस्थितीत थकीत राहता कामा नये, तसेच अपूर्ण कामे ठरवून दिलेल्या वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. निधी वितरण होऊनदेखील ज्या कामांवर अद्याप निधी खर्च झालेला नाही, ती कामे प्राधान्याने सुरू करावीत व देयके तात्काळ सादर करावीत, बचत होणाऱ्या कामांची यादी सादर करून ताळमेळ घ्यावा व ३१ मार्चअखेर पूर्ण करावयाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनादेखील श्री. अंकित यांनी यावेळी दिल्या.

Protected Content