जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील किनोद ते आमोदा रस्त्यावरील घार्डी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीराम सोनाऱ्या बारेला वय-३१ रा. आमोदा खुर्द ता.जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीराम सोनार या बारेला हा तरूण आपल्या परिवारासह आमोदा खुर्द गावात वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी १ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गावातील सहकारी मित्र शालीक बळीराम सपकाळे यांच्यासोबत दुचाकी (एमएच १४ डीएल ७३१४) ने किनोदवरून आमोदा येथे येण्यासाठी निघाले. रस्त्यावरील घार्डी फाट्याजवळ समोरून येणारे दुचाकी (एमएच ०४ डीजे ७५६०) ने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीराम बारेला याचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला शालीक सपकाळे हा गंभीर जखमी झाला. या घटनेबाबत श्रीराम बारेला यांचा भाऊ जगन बारेला यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दुचाकीस्वार प्रवीण मल्हारी सपकाळे रा. करंज ता. जळगाव यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दीपक चौधरी हे करीत आहे.