मुंबई-वृत्तसेवा | शेअर बाजारातील सध्याच्या अस्थिर वातावरणाचा परिणाम आता प्राथमिक बाजारावरही दिसून येत आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे यंदा येऊ घातलेल्या अनेक मोठ्या कंपन्यांच्या आयपीओवर दबाव निर्माण झाला असून काही प्रस्तावांना विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदा जिओ प्लॅटफोर्म, फ्लिकॉर्ट इंटरनेट, एसबी फंड मॅनेजमेंट यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे आयपीओ बाजारात येण्याची अपेक्षा आहे. या प्रमुख कंपन्यांकडून मिळून सुमारे ७० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारला जाऊ शकतो, असे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र जागतिक परिस्थिती आणि बाजारातील चढउतार यामुळे या योजनांवर परिणाम होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

विशेषतः इराण–इस्रायल संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम भारतीय प्राथमिक बाजारावरही जाणवत आहे. त्यामुळे काही कंपन्या आपल्या आयपीओच्या वेळापत्रकावर पुनर्विचार करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, २०२६ च्या पहिल्या तिमाहीत सुमारे १६ हजार कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात आले, तर मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा सुमारे १९ हजार कोटी रुपये होता. त्यामुळे प्राथमिक बाजारात काहीशी मंदी दिसून येत आहे.
यंदा आलेल्या ९ मेनबोर्ड आयपीओंपैकी ७ आयपीओंची लिस्टिंग नकारात्मक झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत आहे. बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार कंपन्यांच्या मूल्यांकनावरही अधिक दबाव टाकत असल्याची माहिती मिळत आहे.
तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत काही कंपन्या आयपीओची वेळ पुढे ढकलण्याचा पर्याय विचारात घेत आहेत. उदाहरणार्थ PhonePe ने आपली आयपीओ योजना पुढे नेण्याचा निर्णय घेतला असला तरी बाजारातील परिस्थिती लक्षात घेऊन अनेक कंपन्या रणनीती बदलू शकतात.
दरम्यान, दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी Jio Platforms आयपीओसाठी बँकांशी चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. कंपनीचे संभाव्य मूल्यांकन १७० अब्ज डॉलर इतके असू शकते. नियमानुसार किमान २.५ टक्के सार्वजनिक भागभांडवल विक्रीद्वारे सुमारे ४० हजार कोटी रुपये उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ई-कॉमर्स क्षेत्रातील Flipkart च्या आयपीओबाबतही मोठी चर्चा आहे. २०२४ मध्ये कंपनीचे मूल्यांकन सुमारे ३७ अब्ज डॉलर होते आणि त्यानंतर अल्फाबेटसारख्या गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक केली होती.
तसेच SBI Funds Management आयपीओद्वारे सुमारे १.२ अब्ज डॉलर उभारू शकते, तर Zepto सारखी स्टार्टअप कंपनीही आयपीओच्या तयारीत असल्याचे समजते.
सध्याची बाजारातील भावना दीर्घकाळ टिकून राहिल्यास, मोठ्या कंपन्यांना आयपीओच्या वेळापत्रकाबाबत पुनर्विचार करावा लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.



