Home Uncategorized भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमधून ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमधून ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक

0
166

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील गणपती बाप्पाला पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिभावाने आणि पारंपरिक वेशभूषेत पोलिस बांधवांनी निरोप दिला. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाआरती करून या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली.

गणेशोत्सव काळात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पोलीस दलाने भक्तिभावाने सजवलेले मंडप, आरास आणि विविध उपक्रमांनी परिसरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण केले होते. गणरायाच्या विसर्जनासाठी पोलिसांना सार्वजनिक मिरवणुकांमध्ये बंदोबस्तासाठी नियुक्त केले जात असल्याने, पोलिस स्टेशनमधील गणपतीला नियोजित वेळेआधीच म्हणजे दोन दिवस आधीच विसर्जनासाठी नेण्यात आले.

या मिरवणुकीची सुरुवात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाआरती करून करण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांनी पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून गणरायाला सढळ निरोप दिला. ढोल, ताशा, लेझीम अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्साहाने गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आली.

या अनोख्या आणि भक्तिभावाने परिपूर्ण मिरवणुकीने उपस्थित नागरिकांनाही भारावून टाकले. गणेशोत्सवातील श्रद्धा आणि शिस्त यांचे समन्वयित दर्शन पोलिस बांधवांनी यानिमित्ताने घडवून आणले. गणरायाला निरोप देताना पोलिस दलाच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि थोडी हुरहुरही स्पष्टपणे दिसून येत होती.

या विसर्जन मिरवणुकीने गणेशोत्सवाच्या धार्मिकतेला सामाजिक शिस्तीची जोड देत एक आगळावेगळा आदर्श साकारला. गणरायाला निरोप दिल्यानंतर आता सर्व पोलीस कर्मचारी जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक विसर्जन मिरवणुकांमध्ये बंदोबस्तासाठी नियुक्त होणार आहेत.


Protected Content

Play sound