मला पदाचा गर्व नाही, मी नम्र माणूस – ना. गुलाबरावांचे भावनिक बोल (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी | माझ्या अंगात मंत्रिपद आलेले नाही, मी आजही खाली झुकून चालणारा नम्र माणूस आहे. मी तुमचा सालदार आहे, तुम्ही माझे सावकार आहात, तुमच्याकडे मी मतांचे कर्ज मागायला आलो आहे, असे भावनिक आवाहन जळगाव ग्रामीण मतदार संघातले महायुतीचे अधिकृत उमेदवार व राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज (दि.१७) सायंकाळी कानळदा येथे झालेल्या प्रचार सभेत केले.

 

ते पुढे म्हणाले की, माझ्या विरोधात गदारोळ करून मी अडचणीत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे लोक समजताहेत की, नगरपालिकेसारखे ते पैसे वाटून आमदारकीतही निवडून येवू शकतो. पण त्यांना माहीत नाही की, पैसे वाटून कुणी निवडून येवू शकला असता तर देशाचा पंतप्रधान एक चहावाला नाही, एखादा मोठा उद्योगपती राहिला असता. यांना मतदार संघातील गावांची नावे माहीत नाहीत. मी आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे, काम झाले नाही तर मीच रस्त्यावर उतरतो. मला विरोधकांवर टीका करायची नाही.

मी म्हसावद येथे दोन कोटींचा बलून बंधारा बांधला आहे, कानळद्यातही येत्या चार महिन्यात बंधाऱ्याचे काम सुरु झाले नाही तर मीच आंदोलन करेन. काहीही करून कानळद्यात पाणी आणेन. तरसोदच्या गणपती देवस्थानला एक कोटींचा निधी दिला आता येथील कण्व आश्रमासाठी एक कोटींचे काम मंजूर केले आहे. माझे विरोधक अपप्रचार करताहेत की, माझे दारूचे दुकान आहे, मी सांगतो की हो आहे, ते परवाना घेवून काढलेले दुकान आहे. माझ्या स्वत:च्या जागेत आहे. मी पोटासाठी काय व्यवसाय करावा, तो माझा प्रश्न आहे, मी चोऱ्या तर करत नाहीये ना ? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. यासभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1159926100875511/

 

Protected Content