जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असेल, तर मतपत्रिकेवर मतदान घ्या : गुलाबराव देवकर (व्हीडीओ)

f4352eb2 9b32 4116 a07d da0910950adc

जळगाव (प्रतिनिधी) जनतेच्या पाठिंब्यावर एवढाच विश्वास असेल,तर मतपत्रिकेवर मतदान घेण्यास काय हरकत आहे? असा प्रश्न उपस्थित करत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, या मागणीसाठी नागरिकांकडून राष्ट्रवादीकडून फॉर्म भरून घेण्यात येत आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, मागील लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करणाऱ्या विरोधी पक्षांनी आता आगामी विधानसभा निवडणुक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरद्वारे घ्यावी यासाठी व्यापक आंदोलन छेडण्याची रणनिती आखली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्यावतीने ईव्हीएमविरोधात मोर्चाची घोषणा करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्रातील लोकांच्या घरोघरी जाऊन बॅलेट पेपरने निवडणूक व्हाव्यात, यासाठी विरोधी पक्षातील कार्यकर्ते फॉर्म भरून घेणार आहेत.

 

फॉर्मवर त्या व्यक्तीचे नाव, फोटो आणि सही असणार आहे. त्यांतर २१ ऑगस्टला विरोधकांचा मुंबईत भव्य मोर्चा निघणार असून, महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे हे जनतेने भरलेले फॉर्म देण्यात येतील. यातील हा पहिला टप्पा असणार आहे. यानुसार आज जळगाव शहरात राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांकडून फॉर्म भरून घेण्यात आले.

 

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, ज्यापद्धतीने भाजपचे नेते आम्ही इतक्या जागा जिंकू, तितक्या जागा जिंकू असं म्हणताय. यावरून निवडणूक फिक्स असल्याचे सारखे वाटत आहे. लोकशाहित मतदान पारदर्शी झाले पाहिजे. कोणत्याही किंतु,परंतुला जागा नको. त्यामुळे पारदर्शक निवडणूक होण्यासाठी बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत,अशी मागणी श्री.देवकर यांनी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, वाल्मिक पाटील,मंगला पाटील,प्रतिभा शिरसाठ,  संजय चव्हाण यांच्यासह जिल्हाभरतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content