कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रश्न फक्त आमचा नसून अवघं जग पाहत आहे, देशामध्ये संविधान टिकणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर नाव खराब करून घेणार नाहीत, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. आंबेडकर यांच्या संविधानानुसार गेलो तर 40 गद्दार अपात्र होतील. पण जर भाजपच्या संविधानाप्रमाणे गेले तर मग काय निर्णय येईल माहीत नसल्याचे ते म्हणाले.
त्यांनी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भेटीवर कडाडून टीका केली. न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेले, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी दोघांच्या भेटीवर हल्लाबोल केला.
महाराष्ट्र कधी संपत नाही, महाराष्ट्र संपवतो, राज्य वेगळ्या मनस्थितीतून जात असून परिस्थिती भयंकर आहे. महाराष्ट्र नॉट ओके झालाय आहे. महाराष्ट्रात चांगलं काही झालं नाही, रोजगार आहे तो काढून नेला जात असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. राज्यातून प्रकल्प पळवापळवी होत असल्याने आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली.
आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. राज्यातील प्रत्येक प्रकल्प गुजरातला पळवला जात आहे. सगळं गुजरातला पळवणार होता, तर सरकार का मारलं? हे सरकार टिकल्यास मंत्रालय सुद्धा गुजरातला नेतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
उशिरा मिळालेला न्याय हा अन्याय असतो असे सांगत आदित्य ठाकरे यांनी संविधानाच्या चौकटीत न्याय केल्यास 40 गद्दार बाद होऊन अपात्र होतील, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणात राहुल नार्वेकर बेअब्रू करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतील याचा फैसला सुद्धा होईल, असेही आदित्य यांनी सांगितले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का? याची चर्चा आहे. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सडकून टीका केली होती. यानंतर त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा दौरा होत असल्याने हा वाद मिटवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभेच्या आडून विधानसभेसाठी काही संकेत मिळणार का? याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात कोल्हापूर आणि हातकणंगलेवर ठाकरे गटाने दावा केला आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडणार असल्याची चर्चा आहे.