धरणगाव, प्रतिनिधी | येथे उद्या (दि.२९) निवडणूक होत असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारास अवघ्या दीड वर्षांची कारकीर्द मिळणार आहे. असे असले तरी, “ही संधी मला मिळाल्यास लोकांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी जास्तीतजास्त विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी कामांचा धडाका लावेन,” असा ठाम विश्वास या निवडणुकीतील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी आज (दि.२८) येथे आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे सगळे इच्छुक उमेदवार आता मतदान जास्तीत जास्त कसे होईल, यासाठी आपापल्या कार्यकर्त्यांसह प्रयत्नशील आहेत. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि काही अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात आहेत. ३० डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
निलेश चौधरी यावेळी पुढे म्हणाले की, “कालावधी कमी मिळत असला तरी कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि आमदार गुलाबराव पाटील यांना लवकरच राज्य मंत्रिमंडळात मिळणार असलेले मंत्रिपद यामुळे मला धरणगाव शहराच्या विकासासाठी वेगाने काम करणे सहज शक्य होणार आहे. मला जर हे पद मिळाले तर मी जीवतोड मेहनत करून अनेक गोष्टी साध्य करून दाखवेन.”