जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोणताही खर्च न करता फक्त खजूर आणि खडीसाखर देऊन शहरातील तरूणाने विवाह केला असून या साध्या सोहळ्याचे कौतुक होत आहे.
जळगाव शहरातील कॅरम या खेळामधील आंतरराष्ट्रीय खेळाडू व जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक सय्यद मोहसीन यांचे चिरंजीव मोहम्मद जुबेर जे स्वतः एक राष्ट्रीय कॅरम खेळाडू आहे त्याचे लग्न अत्यंत साधेपणाने व धार्मिक पद्धतीने शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता मस्जिद ए उमर मध्ये पार पडले. या लग्न सोहळ्यात नवरी कडील भोजनावळीला फाटा देण्यात आला. कोणत्याही प्रकारचे सरबत व चहा न देता आलेल्या सर्व पाहुण्यांना खजूर व खडीसाखर देऊन लग्न लावण्यात आले.
इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित यांनी कथन केले आहे की सर्वात उकृष्ट निकाह तो जो मशिदीमध्ये लावला जाईल, संध्याकाळच्या वेळेला तो मस्जिद मध्ये लागेल व उर्दू शव्वाल चा महिना असल्या तो विवाह उत्तम समजला जाईल त्याप्रमाणे शुक्रवारी १८ मे रोजी हे चारही क्षण जुडून आल्याचे मुफ्ती अतिकउर रहेमान यांनी घोषित केले.
दरम्यान, आज नववधू तब्बसुम हारून खान हिने आपल्या स्वतःला तिचे वकील सलीम खान समशेर खान यांच्या माध्यमाने ११ हजार रुपये मेहेर ही रक्कम ठरवून विवाहाला संमती दिली. मोहम्मद जुबेर यांनी साक्षीदार अब्दुल कलीम व अन्सार अहमद यांच्या साक्षीने तबससुम बानो चा पत्नी म्हणून स्वीकार केला. मस्जिद ए उमर चे इमाम व शहर ए काझी मुफ्ती अतिक उर रहमान यांनी सदरचा निकाह लावला. याप्रसंगी समाजातील महनीय व्यक्तिमत्व सोबत क्रीडा क्षेत्रातील खेळाडू व विविध संघटनाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
क्रीडा संघटना व मुस्लिम समाजातर्फे गौरव
राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू व संघटक असून सुद्धा धार्मिक रिती रिवाजा नुसार लग्न लावल्याबद्दल विविध क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी व जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे अध्यक्ष फारुख शेख यांनी वर मोहम्मद जुबेर व त्याचे वडील मोहसीन सय्यद यांचा गौरव केला.