मुंबई वृत्तसंस्था । शून्य जमाराशीची (झीरो बॅलन्स) सुविधा असणाऱ्या खात्यांतील विशिष्ट व्यवहारावर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय आयसीआयसीआय बँकेने घेतला आहे. या नियमाची अंमलबजावणी १६ ऑक्टोबरपासून करण्यात येईल, अशी माहिती बँकेतर्फे एका परिपत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इतर बँकांप्रमाणे आयसीआयसीआय बँकेनेही शून्य जमाराशी असणारी बचत खाते सुविधा यापूर्वीच सुरू केली आहे. नव्या नियमानुसार, या खातेदाराने बँकेच्या शाखेत जाऊन आपल्या खात्यातून रक्कम काढल्यास तसेच, पैसे भरणा मशिनद्वारे खात्यात पैसे जमा केल्यास प्रति व्यवहार १०० ते १२५ रुपये शुल्क आकारले जाईल. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा बदल करण्यात येत असून संबंधित खातेदारांनी आपले खाते नियमित बचत खात्यात वर्ग करावे अथवा शून्य जमाराशीचे खाते बंद करावे, असे ही बँकेने परिपत्रकात म्हटले आहे.