जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी इकरा एज्युकेशन सोसायटीच्या इकरा युनानी महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटरमधून गेल्या एक महिन्याच्या कालावधीत आतापर्यंत २५६ बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील बाधित रुग्णांवर वेळेत व चांगले उपचार व्हावेत, उपचाराच्या कालवधीत त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात, रुग्णांना लवकरात लवकर बरे होऊन घरी जाता यावे, याकरीता जिल्ह्यात तालुकास्तरावर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात 15 जुलै रोजी शहरातील इकरा युनानी महाविद्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिलहा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण आदिंच्या उपस्थितीत ५० ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर सुरु करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आलेली असून आता इकरा युनानी वैद्यकीय महाविद्यालयात ७० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून १०० रुग्णांवर त्या ठिकाणी उपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये गेल्या एक महिन्याच्या कालावधीत ३११ बाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहे. त्यापैकी २५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 64 रुग्ण हे उपचार घेत आहेत.
या रुग्णांना कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये तसेच त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात, रुग्णांचे समुपदेशन व्हावे, त्याचबरोबर योगा, प्राणायमवर विशेष भर देण्यात येत आहे. येथे रुग्ण दाखल झाल्याबरोबर त्याच्या मनातील भिती घालविण्याचा प्रयत्न करण्यात येतो. तसेच सर्व रुग्णांमध्ये कौटूंबिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.
तसेच जे रुग्ण बरे झाले ते नवीन दाखल होणाऱ्या रुग्णांना आधार देत आहेत. रोटरी जळगाव ईस्टच्यावतीने वर्धमान भंडारी यांनी रुग्णांना नियमितपणे फळे वाटपाची व्यवस्था केली आहे.
या सेंटरमध्ये डॉ. शांताराम ठाकूर व त्यांच्या टिममधील वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका रुग्णांच्या देखभालीसाठी अहोरात्र झटत आहे. या सर्व टिमचा 15 ऑगस्ट रोजी ग्लोबल इंटरनॅशनल फाउंडेशन, नागपूर येथील संस्थेच्यावतीने कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंन्सिडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, संस्थेचे अध्यक्ष करीम सालार, रेडक्रॉस संस्थेचे उपाध्यक्ष गनी मेमन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शोएब आदि उपस्थित होते.