पुणे – शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात मोठा मासा गळाला लागला आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक मोठी नावं समोर आली असून, आता पुणे पोलिसांच्या सायबर सेलने थेट आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. शिक्षण परिषदेच्या आयुक्तापासून अनेकांचा या गैरप्रकारात समावेश असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रकरणात सात हजार 800 अपात्र उमेदवारांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली. अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना प्रमाणपत्र दिल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. या परीक्षार्थींची संख्या आणखी वाढ होवू शकते, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती.
2019-20 साली झालेल्या टीईटी परिक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या परिक्षेच्या निकालातील अंतिम 16 हजार 705 पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुरावा याचा एकत्रित तपास. तसेच परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण सात हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मुळ गुणांमध्ये वाढ करून त्यांना पात्र केल्याचे निष्पन्न झालेले आहे.