मुंबई वृत्तसंस्था । ‘रेप इन इंडिया’च्या उल्लेखावरून मी कदापि माफी मागणार नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितले. ते शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचा उल्लेख ‘रेप कॅपिटल’ केल्याची क्लीप माझ्याकडे आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAB)संसदेत मंजूर झाल्यामुळे ईशान्य भारतात आग लागली आहे. या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भाजपकडून माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. मात्र, मी माफी मागणार नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले असून महत्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
राहुल गांधी यांनी संसदेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, माझ्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ क्लिप आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी दिल्लीला रेप कॅपिटल म्हणत आहेत. हा व्हिडीओ मी ट्विट करणार आहे जेणेकरुन सर्वांना पाहता येईल. भाजपा, नरेंद्र मोदी आणि अमित शाह ईशान्य भारत जाळत आहेत. त्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठीच नरेंद्र मोदी आणि भाजपा माझ्यावर आरोप करत आहेत.