लंडन (वृत्तसंस्था) भारतीय बँकांनी मद्यसम्राट विजय मल्ल्याची बँक खाती ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झालीय. त्यावर स्थगिती आणण्यासाठी मल्ल्याकडूनही प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी त्याने कोर्टात त्याच्या आर्थिक चणचणीची कहाणीच ऐकवली आहे. माझ्याकडे पैसे नाहीत. पत्नीच्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो. पर्सनल असिस्टंट, ओळखीचे उद्योजक आणि मुलांकडून मला उधारी घ्यावी लागते, असे सांगत आपली बँक खाती गोठवली जाऊ नयेत, अशी विनवणी मल्ल्याने कोर्टाला केली आहे.
विजय मल्ल्याची पार्टनर/पत्नी पिंकी लालवानी वर्षाला १.३५ कोटी रुपये कमवते. मल्ल्याकडे आता फक्त २,९५६ कोटींची व्यक्तीगत संपत्ती उरली आहे. ही सर्व संपत्ती त्याने कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सेटलमेंटसाठी ठेवली आहे. १३ भारतीय बँकांनी ११ सप्टेंबर २०१८ रोजी मल्ल्या विरोधात दाखल केलेल्या दिवाळखोरी याचिकेला उत्तर देताना त्याने ही माहिती दिली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये यावर सुनावणी होणार आहे. आपले खर्च भागवण्यासाठी आता आपण पत्नी आणि मुलांवर अवलंबून आहोत असे मल्ल्याने दाखवले आहे. विजय मल्ल्याकडून मिळालेल्या या उत्तराची भारतीय बँकांनी लंडन कोर्टाला माहिती दिली आहे. मल्ल्याने व्यक्तीगत सहाय्यक महाल आणि व्यावसायिक परिचित बेदी यांच्याकडून अनुक्रमे ७५.७ लाख आणि १.१५ कोटी रुपये उधारीवर घेतले आहेत. दरम्यान,मल्ल्याचा दर आठवड्याचा खर्च १६.२१ कोटी एवढा आहे. मात्र त्याने उदरनिर्वाहासाठीच्या या खर्चात कपात करणार असून आता तो दर महिन्याला २६.५७ कोटी रुपये खर्च करणार असल्याचं त्याचे वकील जॉन ब्रिसबी यांनी बुधवारी यूके कोर्टाला स्पष्ट केलं आहे.