पुणे- वृत्तसेवा | पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. भल्या भल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे, असा इशारा शरद पवार यांनी आपल्या विरोधकांना दिला.
शरद पवार यांनी बैलगाडा शर्यतीचे कौतुक केले. ते म्हणाले आतापर्यंत अनेक शर्यती टीव्हीवर पाहील्या पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणे फिटत नाही. त्यांनी अमोल कोल्हे यांचे देखील आभार मानले.
शरद पवार म्हणाल माझी एक तक्रार आहे. सगळ्या भाषणांमध्ये मी ८३ वर्षाचा झालो, ८४ वर्षाचा झालो, असे म्हणतात. तुम्ही माझ काय बघितलं अजून, मी काही म्हातारा झालो नाही. भल्याभल्यांना सरळ करण्याची माझ्यात ताकद आहे. तुम्ही काही चिंता करु नका, असा इशारा शरद पवार यांनी विरोधकांना दिला.
जे काही तुमचं दुखणं आहे ते लवकरच दूर करु, यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व आपण मिळून करु. लवकरच नवा इतिहास घडवू, अशा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. सरकारमध्ये शेतकऱ्यांबाबत आस्था नाही. कांद्यासह शेतमालाला भाव नाही. कांद्याची निर्यातबंदी केली. शेतकऱ्यांवर संकट ओढण्याचे काम होत आहे. मात्र आपण एकजुटीने महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहोत, असे शरद पवार म्हणाले.