अहमदनगर वृत्तसंस्था । महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारला आता जवळपास एक महिना पूर्ण होण्यात येत असून या नव्या सरकारने राज्यातील काही प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात फेरबदल केला आहे. यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ‘मला कोणतीच सुरक्षा व्यवस्था नको, मला दिलेले पोलिस संरक्षण काढून घ्यावे. माझे काही बरेवाईट झाल्यास मीच त्याला जबाबदार राहीन’, असे पत्र हजारे यांनी मुख्यमंत्रींनी पाठवले आहे.
सरकारने एकीकडे अण्णांच्या सुरक्षेत वाढ केली असताना अण्णांनी यावर आज आपली भूमिका स्पष्ट करून मला कोणत्याही सुरक्षेची गरज नसल्याचे म्हटले आहे. अण्णांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून त्यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले आहे. माझे पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे. माझी सुरक्षा काढण्यात आल्यानंतर माझे काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी माझीच असेल, असेही अण्णांनी या पत्रात नमूद केले आहे. यावर आता राज्य सरकार कोणती भूमिका घेते, हे पाहावे लागणार आहे. या पत्राबाबत सरकारकडून वा गृह मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.