मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | अयोध्या दौऱ्याच्या विरोधासाठी राज्यातून राष्ट्रवादीकडूनच रसद पुरवली गेली. या मनसेच्या आरोपावर राज ठाकरेंचा हा बालिशपणा की पोरकटपणा हेच कळत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
राष्ट्रवादीकडून प्रतिक्रियेत तपासे यांनी म्हटले की, राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथांविषयी स्तुतीसुमनं उधळली याबद्दल ते काही बोलले नाहीत. मात्र राज ठाकरेंचा अयोध्या दौरा जाहीर झाल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी विरोध केला. बृजभूषण सिंह हे राष्ट्रवादीचे नसून भाजपाचे खासदार आहेत. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री असताना राज्यात येणाऱ्या व्यक्तीला सुरक्षा ते देऊ शकतात. मात्र ते स्वत:च्या पक्षाच्या खासदाराला आवरु शकले नाहीत. किंवा गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील सुरक्षा देऊ, सुखरुप नेऊ असे म्हटले नाही.
आतापर्यंतच्या सर्व सभांमध्ये त्यांनी शरद पवारांविरोधात वक्तव्य केले असून शरद पवारांनी काय केले, याबद्दल बोलले आहेत. राज्यातील भाजपचे नेते फडणवीस, दरेकर, चंद्रकांत पाटील यांनीदेखील मध्यस्थीदेखील केलेली नाही . राज ठाकरेंनी नवहिंदुत्ववादी नेता म्हणून समोर आणले गेले, तेव्हा त्यांना थांबवण्यासाठी भाजपानेच हा गनिमी कावा केला असल्याचे
थेट आरोप करीत महेश तपासे यांनी म्हटले आहे.