मी समाजासाठी मरायला तयार आहे – मनोज जरांगे पाटील

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मी समाजासाठी मरायला तयार आहे, तुम्ही मला कोण वाचवणारे आहात. मला सलाईन लावण्यापेक्षा सरकारच्या मागे लागा, मला धारेवर धरण्यापेक्षा सरकारच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरा, मला सलाईन लावून समाजाला आरक्षण आरक्षण कसे मिळेल, असा सवाल मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना केला. तर मी सरकारला सोडणार नाही, आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, सरकारच्या मानगुटावर बसून आरक्षण घ्यायचेच आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने समाजबांधवांनी त्यांना बळजबरी सलाईन लावण्यासाठी आग्रह केला. त्यांना अनेकदा विनवणी केल्यानंतर अखेर सलाईन लावले गेले. यावेळी त्यांनी उपस्थित समाजबांधवांना चांगलेच धारेवर धरत मला का धारेवर धरता, मी मरायला तयार आहे ना, जो पर्यंत सरकार कायद्याची अंमलबजावणी करत नाही, तो पर्यंत हा लढा सुरूच ठेवायचा आहे, असे जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, मला सलाईन लावून मला वाचवण्यासाठी तुम्ही तयार आहात, मला मान्य आहे तुम्हाला मी हवा आहे. तुम्ही मला हवे आहात. पण सलाईन लावल्याने सरकार आपले ऐकणार नाही, त्यांना धारेवर का धरत नाही, मला का विनाकारण त्रास देत आहात. जो पर्यंत तुम्ही सरकार, अधिकारी यांना धारेवर धरत नाही, त्यांना जाब विचारणार नाही, तोपर्यंत ते वटणीवर येणार नाही. मला इंजेक्शन लावणारे जे कोणी वीस ते पंचवीस जण आहात, त्यांची आता जबाबदारी आहे की त्यांनी सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. अन्यथा जातीला आरक्षण कसे मिळेल.

मनोज जरांगे म्हणाले की, मी सरकारला सोडणार नाही, आधी अंमलबजावणी कोणत्या दिवशी करणार ते सांगा ना, मग अधिकाऱ्यांच्या मागे लागा, सरकारच्या मागे लागा, आपण आपल्यात वाद करू नका. असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले. काहीही होऊ द्या, जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत मी सरकारला सोडणार नाही.

Protected Content