मी पद्मदुर्ग बोलतोय….!

071f9ed2 4ff5 4b20 b7dc d6ed1ca91751

‘सह्याद्रीच्या शूर मावळ्यांनो,परवा तुम्ही दोन तोफांना गाडे बसवण्याच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं मला भेटायला आलात. काय सांगू तुम्हाला?
माझ्या आयुष्यातील आनंदाचा हा परमोच्च क्षण होता !

तुम्ही माझ्या समोर मुरुडच्या किनाऱ्यावर मोठी गर्दी करता, त्या सिद्दीच्या साम्राज्यातील जंजि-यावर सहली काढता आणि मोठ्या कौतुकानं मुलांना सांगता, ‘हाच तो किल्ला, जो छत्रपती शिवाजी महाराजांनाही जिंकता आला नाही. ‘पण जंजिऱ्याच्या छाताडावर तोफा रोखण्यासाठी, सिद्दीच्या जुलमी साम्राज्याला पायबंद घालण्यासाठी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी माझे बांधकाम करवून घेतले. हे सांगायला, दाखवायला तुम्ही इकडे फिरकतही नाही. मावळ्यांनो, किनाऱ्यावरची पर्यटकांची गर्दी पाहून मला खूप एकटं एकटं वाटतं…

तुम्ही लांबून मोठ्या कष्टानं माझ्याप्रेमापोटी इथे आलात. दोन तोफांना गाडेही बसवलेत. माझ्या अंगाखाद्यावर नाचलात, कुदलात. कधी नव्हे पण परवा मर्दानी ढोलांचे आवाज आणि भंडारा उधळत ‘जय भवानी,जय शिवाजी’चा जयघोष ऐकला. हे ऐकायला खूप दिवस माझे कान आसूसले होते, पण तुम्ही का करताय हे? कोण येणार इथे हे गाडे पहायला? मला एकच वाटतंय की,
सह्याद्री प्रतिष्ठानच्या ह्या एका कृतीमुळे अनेकांचं लक्ष माझ्याकडे वेधलं गेलं आणि आज माझं गतवैभव मला आठवलं….

सिद्दीच्या प्रबळ, जुलमी साम्राज्याला पायबंद घालण्यासाठी कासवाच्या आकाराच्या बेटावर प्रत्यक्ष थोरल्या महाराजांनी माझं बांधकाम करवून घेतलं. ह्या बेटाच्या आकारावरुनच मला ‘कासा किल्ला’ असंही म्हणतात. मुख्य किल्ला आणि पडकोट असे माझे दोन भाग आहेत. पडकोटाची अवस्था तर तुम्ही पाहिलीच असेल. ३१९ वर्षांपासून समुद्राच्या अक्राळविक्राळ लाटा मला येऊन धडकताहेत. पडकोटाचा काही भाग जमीनदोस्त करण्यात तो दर्या यशस्वी झाला पण मुख्य किल्ला आजही पाय रोवून उभा आहे, तुमची वाट पहात.

मुख्य दरवाजाच्या समोरचा कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराचा बुरुज पाहिला ना? हा पाकळी बुरुज. याच्याच आकारावरुन मला ‘पद्मदुर्ग’असे नाव पडले.
माझी निर्मिती करणारे पाथरवट, वडार, मिस्त्री यांची स्वराज्यावर निष्ठा होती, धन्यावर प्रेम होतं. दोन दगडांच्या जोडासाठी वापरलेला चुना पाहिला ना? दगड दोन तीन सें.मी. झिजला पण चुना आजही शाबूत आहे. हा चुनाच मावळ्यांच्या स्वराज्य निष्ठेचं प्रतिक आहे. काही बांधकामं शिवकालीन आहेत तर काही स्वातंत्रोत्तर काळात इथे कस्टमचं ऑफिस होतं तेव्हा झाली आहेत. तेव्हा इथं वर्दळ असायची. बरं वाटायचं. इथलं ऑफिस बंद झालं अन् माझ्या एकटेपणाला सुरुवात झाली…
गडाच्या चारही बाजूंनी खारेपाणी असलं तरी आतल्या भागात गोड्यापाण्याची चार टाकी आहेत. समुद्राची अन् हवामानाची परिस्थिती पाहून नावेकरी माझ्याकडे यायला तयार होतात. आज थोडं त्रासदायकच आहे इथं येणं पण बोटींसाठी धक्क्याची निर्मिती झाली तर तुमचा त्रास कमी होईल. सिद्दीने माझ्या निर्मितीच्या वेळेस अनेक अडथळे आणले, हल्ले केले पण ‘ते’ मावळे सिद्दीला बधले नाहीत. तुम्ही तर इथे यायलाही घाबरता ? प्रत्यक्ष थोरल्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जागेवर माथा टेकवायला कधी येताय? मी तुमची वाट पहातोय आणि भगव्याची सुद्धा.

-✍संभाजी पाटील, चाळीसगाव.

Add Comment

Protected Content