मुंबई प्रतिनिधी | कालच्या धक्कदायक प्रकारानंतर आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर सडकून टीका करत मी सर्वांना पुरून उरलो असल्याचे सांगितले आहे. तर जनआशिर्वाद यात्रा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
काल रात्री उशीरा जामीन मिळाल्यानंतर नारायण राणे आज मीडियाशी बोलणार असल्याची चर्चा होती. यानुसार त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “मी असं काय बोललो होतो की राग आला. ते वाक्य काय मी परत बोलणार नाही. कोर्टाचा निकाल येईपर्यंत बोलणार नाही. भुतकाळामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याची माहिती दिली. तो कसा गुन्हा होतो.” असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. ” ज्यांना देशाबद्दल अभिमान नसतो. त्यांना राष्ट्रीय सण माहिती नसतात. देशाबद्दल अभिमान आहे म्हणून सहन झालं नाही. म्हणून जे आज बोललो ते रेकॉर्डवर आहे.” असं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं. “सेना भवनबद्दल अशी कोण भाषा करेल त्याचं थोबडं तोडा. आदेश दिले. हा क्राईम नाही. कलम १२० अंतर्गत गुन्हा होत नाही.”, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाबाबत उपस्थित केला.
तसेच अनिल परब अधिकाऱ्यांना आदेश देतात पकडा त्यांना, काही दरोडा घातलाय का? राज्यात कायदा-सुव्यवस्था कुठे आहे? दिशा सालियानच्या आत्महत्येत कोण मंत्री उपस्थित होतं? का त्याचा छडा लागला नाही. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात काय घडलं? कुठल्या मंत्र्याला अटक केली? आम्ही यापुढे कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यात जे जे होते ते जेलमध्ये जाईपर्यंत गप्प बसणार नाही असंही सूचक इशारा नारायण राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून माझी जनआशीर्वाद यात्रा सुरु होती. काहीजण माझ्या मैत्रीचा फायदा उचलतात हेदेखील माझ्या लक्षात आलं आहे. ही जनआशीर्वाद यात्रा पंतप्रधानांना ७ वर्ष झाली. या कालावधीत केंद्राने आणलेल्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवणं यासाठी ही यात्रा काढली होती. देशाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात मला कॅबिनेट मंत्री म्हणून घेतलं. सर्व नवनियुक्त मंत्र्यांना राज्यात जाऊन जनतेची आशीर्वाद मागून खात्यातील कामकाजाला सुरुवात करा अशी सूचना पंतप्रधानांनी दिली होती. १९ ऑगस्टपासून माझ्या जनआशीर्वादाला यात्रेला सुरुवात झाली. दोन दिवस खंड पडला आहे. पुन्हा जनआशीर्वाद यात्रा पुढे सुरुच राहील असं राणेंनी सांगितले.