जामनेर प्रतिनिधी। शिकार करून पळून जाण्याच्या बेतात असणार्या शिकार्यांची गाडी रस्त्याच्या खाली उतरून चिखलात रूतली. गाडी काढण्यासाठी ट्रॅक्टरसह काही तरूणांची मदत घेतली. यातूनच शिकार्यांचे बिंग फुटले आणी धुळ्याचे शिकारी जामनेर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या प्रकरणी दोन शिकार्यांना ताब्यात घेण्यात आले असून दोघेजण पसार झाले.
याबाबत वृत्त असे की, वाडीकिल्ला येथील भाजपचे पदाधिकारी विलास पाटील व त्यांचे काका भुवनराव पाटील हे पहाटे साडेपाच वाजेदरम्यान नागणचौकीकडे मॉर्नींग वॉकसाठी जात होते. रस्त्यात एक एम.एच.०२ जे. ९७६० या क्रमांकाची जिप्सी गाडी रस्त्याच्या खाली उतरून चिखलात रूतली होती. त्यावेळी गाडीतील चौघांनी नागणचौकी येथून एक ट्रॅक्टर व काही तरूणांना मदतीसाठी आणले होते. गाडी बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरने ओढत असतांनाच काही तरूणांनी मागून ढकलण्याचा प्रयत्न केला. गाडी बाहेर निघाली मात्र गाडीतून मांसासारखी दुर्गंधी येत असल्याने विलास पाटील यांच्यासह तरूणांना शिकारीबाबत संशय आला. गाडीतील साहित्य हलवून पाहीले असता मांस व मोठ्या रायफल्स दिसल्या. आपले बिंग फुटल्याचे लक्षात येताच शिकार्यांनी विलास पाटील यांचेसह मदतीला आलेल्यांना सोडून देण्यासाठी विनवणी केली. मात्र हा गंभीर प्रकार पाहून तरूणांनी पोलिस व वनविभाग अधिकार्यांना कळवीले. तत्पुर्वी विलास पाटील हे वाडीकिल्ला येथे निघून आले होते. दरम्यान चालक गाडीतच बसलेला असल्याने शिकार्यांनी संधी साधत पळ काढला. शिकारी गाडी घेऊन वाडीकिल्याकडे पळाल्याचे तरूणांनी विलास पाटील यांना फोन करून सांगत गाडी अडविण्यास सांगीतले. त्यानुसार विलास पाटील यांनी सापळा रचून गाडी अडविण्यात यश मिळवीले.
काचेवर मारला दगड
नागणचौकीकडून शिकारी गाडी घेऊन वाडीकिल्याकडे येणार असल्याची माहती विलास पाटील यांना मिळाली. माहती मिळताच पाटील यांनी दुधगाडी आडवी लावण्यास एकाला विनंती केली. मात्र माडी गाडीला धडक देऊन निघून जातील अशी भिती व्यक्त करून दुध गाडीवाल्याने नकार दिला. त्यावेळी जवळच रस्त्याच्या कामावरील एक डंपर आडवे लावण्याचा विचार करीत असतांनाच काही तरूण रस्त्यात आडवे उभे राहिले. मात्र विलास पाटील यांनी संभाव्य धोक्याची कल्पना देत तरूणांना सावध केले. हातात दगड घेऊन रस्त्याच्या कडेला उभे रहा गाडी येईल तर दगडांचा मारा करा अशा सुचना केल्या. सुसाट वेगाने येणारी गाडी पाहून तरूणांनी दगडफेक केली. चालकाच्या समोर काचेवर दगड लागताच चालकाचा ताबा सुटून गाडी उलटली. त्यानंतर तरूणांनी आक्रमक होत शिकार्यांना पकडले. यावेळी शिकार्यांना मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला.
बंदूक पहातांना सुटली गोळी
दरम्यान, फसलेली गाडी निघाल्यानंतर शंका आल्याने तरूणांनी गाडीच्या पाठीमागील भागाची पहाणी केली. मर गाडीत मांसासह दोन रायफल्स असल्याचे दिसून आले. एका तरूणाने एक रायफल काढून हाताळण्याचा प्रयत्न केला असता ट्रिगर दबून गोळी सुटली. सुदैवाने बंदुकीची दिशा जमीनीकडे असल्याने अनर्थ घडला नाही. यावेळी दोन रायफल्स, १२ मोठे जिवंत राऊंडस्, दोन खाली केस, २१ लहान राऊंड्स व आठ खाली केस असे साहित्य पोलिसांना आढळून आले. पोलिस निरिक्षक प्रताप इंगळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक धरमसिंग सुंदरडे, पालिस उपनिरिक्षक विकास पाटील, सहाय्यक फौजदार जयसींग राठोड, पोलिस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल राहूल पाटील, अमोल घुगे, अमोल वंजारी यांचेसह वनक्षेत्रपाल समाधान पाटील, यांच्या पथकाने पुढील कारवाई केली.