ख्यातनाम ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अंतर्गत ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा) या विषयावर शोध प्रबंध सादर केला आहे. यातील सारांशाचा वाचा हा सातवा भाग.
संशोधनासाठी निश्चित केलेला विषय ‘बहुमाध्यमांतून प्रसारित कृषी नवतंत्रज्ञान विषयक माहितीचे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानावर झालेल्या परिणामांचे विश्लेषणात्मक अध्ययन (विशेष संदर्भ : जळगाव जिल्हा)’ यातील संकल्पनेनुसार शेतकरी वर्ग आणि कृषी क्षेत्रातील बहुमाध्यमांचा प्रसार – प्रभाव अभ्यासल्यानंतर कृषी क्षेत्रातील सध्याचे अद्ययावत नवतंत्रज्ञान आणि शेती तंत्रातील विकासाचा टप्पेनिहाय इतिहास समजून घेणे आवश्यक होते. यासाठी गाईड प्रा. डाॅ. सुधीर भटकर यांनी महत्त्वपूर्ण क्रमशः मुद्दे दिले.


मी स्वतः पत्रकारितेत प्रवेश करण्याच्या अगोदर शेतकरी कुटुंबात असताना शालेय – महाविद्यालयीन शिक्षण घेतले होते. शेतीशी संबंधित विविध कामांचा – पद्धतींचा मी घरातून अनुभव घेतलेला होता. पिकांसाठी शेतजमीन तयार करणे (नांगरणे – वखरणे), शेतजमीनीचा पोत फिरवणे (फणसणे), पिकांच्या लागवड किंवा पेरणीसाठी बांध – बंधारे – वाफे तयार करणे, पांभरने पेरणी आणि टोचून लावणी करणे, हाताने खत देणे, रसायनांची फवारणी, पाणी देणे, पिकांमध्ये वाढणारे तण वखरून वा उपटून काढणे, अळी किंवा किट यासारख्या संसर्गजन्य रोगांचे निर्मूलन करणे, पिकांची वाढ, संरक्षण, पिकांची काढणी, वाळविणे – सुकविणे, घरापर्यंत वा बाजारापर्यंत वाहून नेणे अशा अनेक कामांचा मी अनुभव घेतलेला होता. त्यामुळे शेतीच्या नवतंत्राचा विकास अगदी प्राचीन म्हणजे अश्मयुगापासून माहिती करून घेणे हे माझी उत्कंठा वाढविणारे होते.

विविध ग्रंथ – पुस्तके वाचनातून एक संदर्भ मिळाला तो म्हणजे, धान्याचे काही दाणे (बियाणे) पेरून पुन्हा नव्याने धान्य पिकवता येते हे खान्देशातील प्रकाशा (जि. नंदुरबार) येथील महिलांनी शोधू काढले. तो काळ सिंधु संस्कृतीच्या नंतरचा असावा. भारतातील कृषी क्षेत्राच्या विकासात प्रकाशा व पाटणे (ता. चाळीसगाव) येथील प्राचीन संस्कृतीशी संबंध दर्शवतात असे तपशील समोर आले. माझ्यासाठी ही आनंददायी माहिती होती. मी स्वतः प्रकाशा व पाटणे येथे जावून तेथील संस्कृतीचे प्राचीन अवशेष पाहून आलो.

भारतात अलिकडे हरियाणातील राखीगढी येथे झालेल्या उत्खननात आढळलेल्या मानवी हाडांच्या सापळ्याचे आयुष्य कार्बन डेटींग पद्धतीनुसार सुमारे अडिच लाख वर्षे एवढे अती – अती प्राचीन असल्याचा दावा केला गेला आहे. पाटणे येथील हाडांच्या सांगाड्याविषयी सुद्धा तसाच दावा करणे शक्य आहे. त्यामुळे खान्देशातील मानवी वसाहतींचा इतिहास अती – अती प्राचीन असल्याचे म्हणता येते.

भारतातील शेतीचा अभ्यास थेट नवअश्मयुगापासून केला. वैदिक काळातील शेतीचे तंत्र माहिती करून घेतले. कृषीशी संबंधित पाराशर ऋषी यांचे विविध तंत्र माहिती करून घेतले. रामायणातील राजा जनक हा शेतकरी होता आणि सीता ही त्याला शेती नांगरणी करीत असताना एका पेटीत आढळली याचाही अर्थ लक्षात आला. याबरोबरच खान्देशातील शेतीचा इतिहास व सिंचन पद्धतींची माहिती घेतली. खान्देशातील कृषी संस्कृती तापी, गिरणा अशा नद्यांच्या काठावर विस्तारली. खान्देशातीलच नव्हे तर भारतातील पेरणी करण्याची पद्धत प्रकाशा येथे विकसित झाली, हे लक्षात आले. खान्देशात सिंचनासाठी गुरूत्वाकर्षणाचा वापर करून ‘फड पद्धत’ विकसित झालेली होती. याबरोबर पाट, कालवे होते असेही तपशील समोर आले. खान्देशात पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाण्याचे तलाव तयार केले जात. त्यामुळे अनेक गावांच्या नावात पाणी किंवा कुंड या शब्दांचा वापर केलेला दिसतो. खान्देशात चौदाव्या शतकात दगडी बंधारे असल्याचा तपशील समोर आला.

यानंतरचा काळ हा शेतीच्या यांत्रिकीकरणाचा मानला जातो. लोखंडाचा वापर अगोदर शस्त्रे व नंतर शेतीची अवजारे तयार करण्यासाठी सुरु झाला. याच काळात भारतात इंग्रजांची राजवट होती. शेतीतील यांत्रिकीकरण खऱ्या अर्थाने ब्रिटीशांनी सुरु केले. १९६० मध्ये लोखंडी नांगर वापरला गेला. यानंतर कोळपे, वखर, खुरपे, फाळ तयार झाले. प्रारंभी लोखंडी अवजारे जड होती. हळूहळू त्यात सुधारणा होत गेली. भारतात लोखंडाचा वापर सुरु झाल्यांतर त्याच्याशी संबंधित कामे करणारे – त्याचे कौशल्य असणारे सुतार – लोहार हे घटक तयार झाले. अशा इतर घटकांचा मिळून ‘गावागाडा’ तयार होत गेला. पूर्वीच्या कृषी संस्कृतीत काम करणे – हस्त कौशल्य यावरून कारागीर समाज घटकांची विभागाणी झाल्याचे दिसते. दिवाळी, पोळा, भाऊबीज अशा सणांच्यावेळी कारागिरांना घरी बोलावून मान – सन्मान दिले जात असेही संदर्भ समोर आले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन भाग १ : शिक्षण आणि नोकरीशी संबंधित अनुभवांचा प्रवास !
शेतीच्या कामांसाठी गरजेनुसार अवजारे तयार होवू लागली. त्यात पेरणीपूर्व मशागतीची, पेरणीसाठीची, वाढलेल्या पिकांमध्ये मशागतीसाठी, पिकांच्या काढणीसाठी अशी काम निहाय अवजारे तयार झाली. भारतातील कृषी पद्धतीवर ब्रिटीशांचा प्रभाव होता. भारतावर त्यांचा अंमल असताना येथील जनता उपाशी असू नये म्हणून त्यांनी भारतात कृषी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले. शेतीच्या तांत्रिकीकरणाचा भारतात प्रचार – प्रसार ब्रिटीशांनी केला असे म्हणता येईल. भारतातून इग्लंडला कापूस नेण्यासाठी ब्रिटीशांनी रेल्वे मार्गाचा विस्तार केला. त्याकाळात खान्देशातील कापूस इग्लंडला पोहचला. खान्देशातील ‘कोचूर’ ची केळी ‘कचोरी’ केळी म्हणून दिल्ली रेल्वेस्थानकावर पोहचली.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग २ – पीएच. डी. प्रवेशातील रंजकता
शेतीतंत्र विकसित होत असताना शेती करण्याच्या विविध पद्धती तयार झाल्या. या पद्धतीत भूभाग, हवामान, वातावरण, ऋतू, सिंचन उपलब्धता याच्यावर आधारलेल्या होत्या. पावसाच्या पाण्यावर होणारी खरीप, धरणे – कालवे यातील पाण्यावर होणारी रब्बी – उन्हाळी शेती पद्धती तयार झाली. कालवे – पाटातील पाणी, विहिरी – तलाव यावर आधारलेली बागायती शेती होवू लागली. यानंतर पीक निहाय शेती पद्धतीचा विकास झाला. कडधान्याची, तृणधान्याची, तेलबियांची, फळबागांची, भाजीपाल्याची, फुलांची शेती पद्धती तयार झाली.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ३ – संशोधन कार्याचा वेगाने प्रारंभ !
यानंतर खतांच्या वापरानुसार शेती प्रकार तयार झाले. रसायनांचा वापर, सेंद्रीय पद्धतीचा वापर होऊ लागला पुढील काळात यांत्रिकीकरण अधिक विकसित झाले. शेतात मनुष्य व जनावरांचा (बैल – घोडे – खेचर) वापर कमी करून ट्रॅक्टरसारख्या यंत्राचा वापर सुरु झाला. अगोदर अवजड व भव्य वाटणारे ट्रॅक्टर तयार झाले. आता खेळण्यातील वाटतील असे ट्रॅक्टर तयार आहेत. शेतीतील टप्पे निहाय यांत्रिकीकरण म्हणजे गोफण वापरून पिकांचे संरक्षण करणे ते आज घरी बसून मोबाईलमधील अॅपच्या माध्यमातून ‘ड्रोण’ च्या साहाय्याने पिकांचे निरीक्षण करणे होय. अशा प्रकारे विकसित शेती यांत्रिकीकरण हा सविस्तरपणे लेख लिहिण्याचा विषय आहे.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ४ – संशोधन म्हणजे काय ?
शेतीच्या आज वापरात असलेल्या नवतंत्रज्ञानात प्रामुख्याने माती परिक्षण, जल परिक्षण, पिकांचे गुणवत्तापूर्ण बियाणे वा रोपे यांचा वापर, लागवड – पेरणी पद्धती, मल्चिंग – टोपणी – टोचणी पद्धती, वाफा आणि पिकांमधील अंतराच्या पद्धती, आंतर पिकांच्या पद्धती, सिंचाच्या तुषार – ठिबक पद्धती, मशागतींच्या – किटनाशके – पोषके देण्याच्या पद्धती, पावडरची वा द्रव खते देण्याच्या पद्धती, पिकांच्या पोषणाच्या – वाढीच्या पद्धती, संरक्षणाच्या पद्धती, पीक काढणीच्या पद्धती, पिकांचा साठा करणे – वाहतूक पद्धती, विक्रीसाठी बाजारपेठ व योग्य बाजारभाव मिळविणे अशा अनेक संकल्पना – कार्यपद्धतींचा समावेश आहे. त्यामुळे शेतीचे नवतंत्र आणि त्याचा वापर हा माहिती घेताना प्रत्यक्ष पाहणी – निरीक्षण करण्याचाही विषय आहे हे माझ्या लक्षात आले. त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेत शिवारात भेटी देऊन शेतीचे अत्याधुनिक नवतंत्र समजावून घेतले.
हे देखील वाचा : मी आणि माझे संशोधन : भाग ५ – संशोधन पद्धती निश्चित करणे !
शेतीत संगणकाचा वापर, इंटरनेटचा वापर, मोबाईलचा वापर या बदलत्या संकल्पनांची कृतीशील माहिती घेतली. कृषी नवतंत्र शोध, वापर, प्रचार – प्रसार यासाठी सरकारी यंत्रणांची कामे, योजना सवलती याचाही सखोल अभ्यास केला. शेतीचे नवतंत्र विकसित करण्यात सरकारी कृषी विभागाशी संबंधित विविध यंत्रणांचा क्रियाशील सहभाग असल्याचे समजून घेतले. अगदी अलिकडे डिजिटल शेती तंत्र वापराकडे काही शेतकरी वळले आहेत. त्याचीही माहिती घेतली. कृषी नवतंत्र विकासाचे सर्व टप्पे समजून घेताना केळी उत्पादनातील नवतंत्र आणि त्याचा उपयुक्त वापर याचीही सविस्तर माहिती घेतली.
(पुढील भाग – ‘जेआयएसएल’ आणि कृषी नवतंत्रज्ञान )



