मुंबई , वृत्तसंस्था । केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी सायंकाळी अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला. त्यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार आहेत. हाच धागा पकडत राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परिक्षा कसा घ्यायचा असा प्रश्न केंद्र सरकार आणि युजीसीला विचारला आहे. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
न्यायालयानं परिक्षा घ्यायचा आदेश दिल्यानंतर राज्य सराकरनं तशी तयारीही दर्शवली होती. मात्र, शनिवारी अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला. यामध्ये ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात असा आदेश काढण्यात आला. राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुन केंद्राला सवाल केला आहे. “केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाउन मुळे बंद राहणार. यूजीसी म्हणते 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या ..राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय ..30 सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा.” असा प्रश्न उदय सामंत यांनी केला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गंत राज्यं परीक्षा पुढे ढकलू शकतात. मात्र यूजीसीसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी नवीन तारीख निश्चित करावी लागेल असं सांगितलं आहे. तसंच ३० सप्टेंबरच्या आधी परीक्षा घेणं अनिवार्य नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने निकालात सांगितलं आहे.