जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोंबडी बाजाराजवळ रात्री एका तरूणावर हल्ला करण्यात आल्यानंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी जेएमपी मार्केटजवळ त्याला मृत्यूने गाठल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत वृत्त असे की, आज सकाळी जेएमपी मार्केटमध्ये एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात कोंबडी बाजाराजवळ असणार्या एका दुकानाजवळ या तरूणाची इतरांशी झटापट झाल्याचे दिसून आले. येथून काही अंतरावर असणार्या जेएमपी मार्केटमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. तो रक्तबंबाळ झाला असल्याने या मार्गावर त्याच्या रक्ताळलेल्या पायाचे ठसेदेखील पोलिसांना आढळून आले आहेत.
दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एका अंडा-पावच्या गाडीवर झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. यात जीव वाचवण्यासाठी त्या तरूणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मृत्यूने गाठल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता मृत तरूणाचे नाव प्रशांत सिध्देश्वर जंगाळे ( वय ३५) असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर अधिक्षक निलाभ रोहन यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. दरम्यान, हा हल्ला नेमकी कुणी केला याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नसून पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.