जळगावकरांनो, असे चिरडून मरणे किती काळ सहन करणार ? ( ब्लॉग )

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काल जळगावातील कालींका माता चौकातल्या अपघातात चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर समाजमन सुन्न झाले असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव शिंदे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. त्यांनी समाजमाध्यमात शेअर केलेले हे भाष्य आपल्यासाठी सादर करत आहोत : संपादक

काल दिनांक २५ डिसेंबर रोजी सायंकाळी कालिका माता मंदिर चौकात एका विना क्रमांकाच्या वाळूने भरलेल्या डंपरखाली एका चिमुकल्याचा चिरडून भयानक मृत्यू झाला. असे अनेक मृत्यू आम्हा जळगावकरांसाठी नित्याचेच आहेत. महसूल प्रशासन, वाहतूक पोलीस, आरटीओ गेल्या अनेक वर्षांपासून वाळू माफियांच्या दहशतीखाली त्यांच्या तालावर नाचताहेत. याला आर्थिक लाभाची आणि राजकीय आशीर्वादाची किनार आहे.गेल्या दोन वर्षात वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांपासून मंडल अधिकारी तलाठ्यापर्यंत अनेक जीव घेणे हल्ले संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले. मात्र यावर थातुर-मातुर कारवाईच्या पलीकडे काहीही झले नाही.
जळगावचे सर्वज्ञानी जिल्हाधिकारी यांनी प्रतिक्रियेच्या प्रसादाच्या पलीकडे अजूनही दिलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू व गौण खनिज वाहतूक करणारा वाहणारा कारवाईच्या दिलेल्या लेखी आदेशाला भ्रष्ट आरटीओ विभागाने केराची टोपली दाखवली आहे. वाळू व गौण खणीज विभागाचे अधिकारी तर खाजगीत सांगतात की वाळू व गौण खनिजाचे वाहतूक करायची ती सायंकाळी व रात्रीच करा दिवसा कार्यालयीन वेळेत करू नका. पण माझं काय ते पूर्ण करा… हे असले जळगाव प्रशासनाचे अधिकारी आहेत.

 

जळगाव शहरातून भरधाव वेगाने दिवसाढवळ्या जाणाऱ्या विना क्रमांकाच्या गौण खनिज व वाळू, राखे ने भरलेले भरधाव वेगाने जाणारे डंपर, बलकर ट्रॅक्टर वर आरटीओ, वाहतुक पोलीस कायम दुर्लक्ष करतात. याउलट ग्रामीण भागातून मोटरसायकल वर आलेल्या सामान्य माणसाला तातडीने अडवून अपमान जनक वागणूक देत दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांमार्फत केली जाते. त्यासाठी विशेष अभियान सुद्धा राबवले जाते. अत्यंत गंभीर म्हणजे या डंपर बलकर मध्ये परवानगी पेक्षा दुप्पट वजन म्हणजे ओव्हरलोड असला तरीही कुठलीही कारवाई आजपर्यंत केल्या गेलेली नाही परिणामी शासन कोट्यावधी रुपयाच्या आर्थिक लाभापासून वंचित झाले आहे.
कालच्या गंभीर अपघातात या चिमुकलीला चीरडणारा हा विना क्रमांकाचा दुप्पट वजन असलेल्या वाळू खाली करून आलेला डंपर भुसावळ नशिराबाद कडून येत होता. या महामार्गावर वाहतूक पोलिसांची कायम गस्त असते. सर्वसामान्यांना अडवणारे महामार्ग पोलीस मलिदा गोळा करण्यापलीकडे काहीच करत नाही अशी कायम चर्चा आहे.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गा वर समांतर रस्त्यांची जागा उपलब्ध असतानाही या समांतर रस्त्याच्या जागेवर जळगाव शहरातील धनदांडग्यांनी प्रचंड प्रमाणात पक्क्या इमारती आणि व्यवसाय उभे करून अतिक्रमण केलेले आहे. यासह अनेक टपरीधारकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. परंतु महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या प्रशासनाच्या कचखाऊ भूमिकेमुळे हे अतिक्रमण उठवण्यासाठी आजपर्यंत साधी नोटीस देण्याची ही हिंमत न केल्यामुळे अतिक्रमणामुळे मोठा रस्ता अरुंद झाला. विशेष म्हणजे अतिक्रमण हटावची मोहीम करण्याचं नाटक महापालिके मार्फत केले जाते हे नाटक काही क्षणापुरतच असतं. यामुळे सुद्धा या अतिक्रमणधारकांचे फावते आहे. या मुळेही अपघातात बळी जात आहेत. यामुळे अनेकांना कायम अपंगत्व येत असून काही निष्पाप निरपराध कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

दुसरीकडे जळगावच्या बाहेरून जाणारा बायपास अनेक वर्षांपासून रखडण्याचे उत्तर जिल्हाधिकारी यांनी देणे गरजेचे आहे. बायपास चे अपूर्ण काम यासह भुसावळ नशिराबाद जवळील रेल्वे फ्लायओव्हरचे अपूर्ण काम अनेक जीवघेणे अपघात होत असतानाही टोलधाडी च्या माध्यमातून वाहनधारकां कडून बेकायदेशीर कोट्यावधी रुपयाची लूट करण्यात येत आहे.

पाळधी सह विद्यापीठाकडून साईड पट्ट्या नसलेल्या महामार्गावरून जळगाव शहरात ये जा करणारे हजारो विद्यार्थी नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. गिरणा नदीवरील पुलावर तर अनेक अपघात होत असतात. या रस्त्यावरच्या अनेक वर्षांपासून अपघाताची नियमित मालिकाच सुरू आहे. ढिम्म जिल्हा प्रशासन, निष्क्रिय वाहतूक पोलीस यंत्रणा, भ्रष्ट आरटीओ अधिकारी यांच्या चक्रव्यूहात अनेकांचे बळी गेले आहेत आणि जात आहेत. त्यामुळे याला जबाबदार असणारे वाहतूक पोलीस, आरटीओ व बेकायदा वाळू साठी मदत करणारे महसूल प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. अन्यथा आम्ही जळगावकरांनी स्वतःला बिना नंबरच्या बेकायदा चालणाऱ्या गौण खनिज वाळू डंपर आणी राखेच्या बल्कर खाली चिरडून घ्यावे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे.
संपर्क क्रमांक : ९४२२२८३२३३

Protected Content