शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हटलेले कसे चालते ? : मुनगुंटीवार यांचा सवाल

4Sudhir Mungantiwar 36

मुंबई, वृत्तसंस्था | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने राजकीय पक्षांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना भाजपा नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? अशी विचारणा केली आहे. तसेच यावेळी त्यांनी ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावरुन पक्षाची भूमिका मांडली. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत शिवरायांची तुलना होऊ शकत नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले. “जाणता राजा ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वापरली जाणारी उपमा आहे. ती उपमा शरद पवार यांच्यासाठी सर्रास वापरली जाते. ते तुम्हाला चालते. इंदिरा गांधी यांना ‘इंदिरा इज इंडिया’ असे म्हटले गेले आहे. तेही तुम्हाला मान्य आहे,” अशी आठवण त्यांनी विरोधकांना करुन दिली.

 

“राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. अत्यंत नीच दर्जाचे राजकारण केले जात आहे. इंदिरा गांधींनी जेव्हा बांगलादेशविरोधातील युद्ध जिंकले तेव्हा त्यांना दुर्गादेवीचा अवतार म्हणण्यात आले होते. दुर्गादेवीची बरोबरी इंदिरा गांधी कधीच करु शकत नाही हे माहिती होते. पण एखाद्या व्यक्तीचा गौरव करताना असे वक्तव्य अनेकदा केले जाते. ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ असेही म्हणण्यात आले होते. शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जाणता राजी ही उपाधी देण्यात आली होती. शरद पवारांवर जाणता राजा नावाने पुस्तक निघाले. त्यांच्या कार्यकाळात ३५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मग शरद पवारांवरील पुस्तकाला जाणता राजा नाव का देण्यात आले ? महाराजांशिवाय ही उपाधी कोणालाही लागत नाही. जाणता राजा म्हणजे गावचा सपरंच नव्हे,” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली.

“या देशात शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणे शक्यच नाही हे खरे आहे. जोपर्यंत ब्रम्हांड आहे तोपर्यंत कोणीही त्यांच्या तुलना करु शकत नाही. नरेंद्र मोदीदेखील करु शकत नाहीत,” असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. “पण मोदी देशाला ज्याप्रमाणे विकासाच्या मार्गावर नेत आहेत, देशाची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेक जटील प्रश्न सोडवले त्यामुळेच त्यांच्याबद्दल घाणेरडं राजकारण केलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. इंदिरा गांधींना दुर्गादेवीची उपमा दिली तेव्हा यांचे कंठ कुठे गेले होते ? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.

संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना, पवारसाहेब जाणता राजा कधीच होऊ शकत नाही. सरकारनेही राजीनामा दिला पाहिजे. मग महाराजांचे वंशजही राजीनामा देतील असे प्रत्युत्तर दिले. “हे पुस्तक काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचे काम आहे. तामिळनाडूत इंदिरा गांधींचे मंदिर बांधण्यात आले होते. मोदींना जेव्हा आपले मंदिर बांधण्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी फटकारले होते. काही अतिउत्साही कार्यकर्ते असतात पण यामुळे ही पक्षाची भूमिका आहे म्हणणे चुकीचे आहे,” असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Protected Content