नाशिक | कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहूल गांधी हे काश्मीरात गेल्यावरच बॉंब स्फोट कसा ? असा प्रश्न उपस्थित करत राहूल यांना संपविण्याचा कट रचण्यात आल्याचा सनसनाटी आरोप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाशिक येथे व्यर्थ ना हो बलीदान या उपक्रमाच्या अंतर्गत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले एक वक्तव्य वादाचा विषय बनले आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी जम्मू काश्मीरमध्ये गेले आहेत. तिथे ते गेले अन् बॉम्बस्फोट झाला. ते तिथून गेले होते म्हणून बरं झालं. राहुल गांधी जिथे थांबले होते तिथून ५०० मीटर अंतरावर हा बॉम्बस्फोट झाला. राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट कसा झाला? राहुल गांधींना संपवण्याचा कट तर नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी उपस्थित केली आहे. काल सायंकाळी त्यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राहुल गांधी दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौर्यावर आहेत. दरम्यान नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याप्रसंगी पटोले पुढे म्हणाले की, नोटाबंदी झाल्यावर दहशतवाद संपेल असं यांनी सांगितलं होतं. पण मग दहशतवाद संपला का? नोटाबंदीचं सोडून द्या पण मग तुमच्याकडे इतकी मोठी यंत्रणा असताना दहशतवादी राहुल गांधी होते तिथपर्यंत कसे काय येऊ शकले ? देशासाठी गांधी कुटुंबातील दोन व्यक्तींनी बलिदान दिलं आहे. या देशाच्या मातीत त्यांचं रक्त सांडलं. जे राहुल गांधी आज देशाच्या जनतेचा आवाज होऊन देशासाठी काम करत आहेत त्यांना संपवण्याचा हा कट तर नाही हा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो, असे पटोले म्हणाले असून यावरून वाद पेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.