प्रताप कॉलेजच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांचा आत्मदहनाचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी | परीक्षा देऊनही अनुपस्थित दाखवल्याने अनुत्तीर्ण झालेल्या येथील प्रताप महाविद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास १२ ऑगस्ट रोजी कॉलेजसमोर आत्मदहन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील प्रताप महाविद्यालयातील टीवायबीएससी वर्गातील ७० विद्यार्थी नापास झाले आहेत. या सर्वांनी परीक्षा दिली असूनही त्यांना अनुपस्थित दाखवून नापास करण्यात आले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊनही यावर काहीही निर्णय झालेला नाही. या अनुषंगाने येत्या ४८ तासांत प्रश्न निकाली न निघाल्यास १२ ऑगस्टला, महाविद्यालयासमोर विद्यार्थी आत्मदहन करतील, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने प्राचार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, टीवायबीएस्सीच्या अंतिम वर्षाचा निकाल लागला आहे. काही विद्यार्थ्यांना नापास व गैरहजार दाखवले आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने आंदोलही केले होते. निकाल लागून सुमारे १५ दिवस उलटले आहेत. त्यामुळे त्यांच्या करिअरवर प्रश्नचिन्हा निर्माण झाले आहे. हे विद्यार्थी १२ ऑगस्ट रोजी महाविद्यालयासमोर आत्मदहन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे सचिव भूषण भदाणे, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी, अनिरुद्ध शिसोदे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी पोलिस व कुलगुरू यांना देण्यात आल्या आहेत.

Protected Content