शॉर्टसर्किटमुळे घरात आग; दीड लाखांचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर हुडको भागात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाच्या घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत घरातील गृहोपयोगी वस्तू जळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या संदर्भात रात्री अकरा वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगरमधील हुडको भागात शेख अफसर शेख (वय ३५) हा तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे. गुरुवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्याचे घर बंद असताना घरातून अचानक धूर निघाला. यावेळी शेजारी राहणाऱ्या महिलेच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून पाहिले असता घरात शॉर्टसर्किटमुळे फ्रीजला आग लागलेली होती. त्यामुळे घरातील इतर गृहोपयोगी वस्तूदेखील जळून खाक झाल्या होत्या.

स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी सहकार्य केले. परंतु तोपर्यंत वाशिंग मशीन, लाकडी कपाट, मिक्सर, गादी व इतर सामान आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती. यामुळे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात जळगाव शहर पोलिसात खबर देण्यात आली. त्यानुसार रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पाटील करीत आहेत.

Protected Content