मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज कोसळून सारोळा येथील एका घराची अक्षरश: राखरांगोळी झाली असून आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ पाहणी करून मदतीची ग्वाही दिली.
या संदर्भातील माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा येथे काल दिनांक १४ जुलै रोजी रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास प्रचंड विजांचा कडकडाटासह वीज कोसळल्याने अमोल गजानन काळे यांचे घर पूर्णपणे बेचिराख झाले. सुदैवाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे एका कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे अनर्थ टळला. तथापि, यामुळे त्यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच तहसीलदार वाडे यांना तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई साठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना सूचना केल्या. यासोबत वैयक्तिक मदत देखील करण्याचे आश्वासन देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाला धीर दिला.