Home क्राईम महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार !

महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार !


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील राष्ट्रीय महामार्गावर म्हसवे फाट्याजवळ मंगळवारी १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुदैवी आणि भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर कारने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने स्कुटीस्वार महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने पारोळा शहर आणि म्हसवे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भावना प्रशांत मुळे (वय ५३, रा. नाथजी नगर, पारोळा) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. भावना मुळे या शिक्षिका असून, त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मंगळवारी सायंकाळच्या वेळी त्या आपली स्कुटी (क्र. एमएच १९ बीटी ०५७२) घेऊन म्हसवे फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावरून जात होत्या.

यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या (जीजे २६ एके १७५०) या क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, भावना मुळे रस्त्यावर दूर फेकल्या गेल्या आणि त्यांच्या डोक्याला तसेच शरीरावर गंभीर दुखापत झाली. अपघातस्थळीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि वाटसरूंनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक समाधान डिगंबर पाटील (वय ३४, रा. अंतुर्ली, ता. पाचोरा) याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या अपघातामुळे मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Protected Content

Play sound