सावदा/फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्त समाजातील कर्तुत्ववान महिला आणि महिला अधिकारी यांचा व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेतर्फे आज ता ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
फैजपूर येथील नगरपालिका सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश उज्जनवाल, सन्मानार्थी महिला अधिकारी फैजपूर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, डॉ.योगिता पाटील रावेर, ब्रह्मकुमारी वैशाली सावदा, मनीषा महाजन मुख्याध्यापिका खिरोदा, कर्तुत्ववान शेतकरी वैशाली पाटील, व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष रवींद्र नवाल, उद्योजक सुनील बढे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी देऊन कर्तृत्वान महिला अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह म्हणाल्या जर ठरवलं तर महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा वाव आणि संधी आहे. फक्त आपल्याकडे त्यासाठी आत्मविश्वासाने या दृष्टीने तयारी करण्याची आवश्यकता आहे. व्हॉईस ऑफ मीडियाने हा अति उत्कृष्ट असा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी कौतुक केले. सुरेश उज्जैनवाल म्हणाले नारीशक्ती ही समाजातील मोठी शक्ती आहे. त्यांनी ठरवलं तर ते समाजामध्ये बदल घडवून आणू शकतात.याची अनेक उदाहरणे आहेत.
समाजातील कर्तुत्वान महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने सत्काराचे आयोजन केले. प्रास्ताविक पत्रकार आणि व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा खजिनदार दिलीप वैद्य यांनी तर सूत्रसंचालन व व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाला रावेर यावल तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.