छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गप्पा मारणा-या भावाने अचानक बहिणीला धक्का देऊन खवड्या डोंगरावरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. यात २०० उंचावरून खाली पडल्याने मुलीचा जागीच मृत्यू झाला. नम्रता गणेशराव शेरकर (१७ वर्ष, रा. शहागड, श्रीराम कॉलनी ता. अंबड जि.जालना) असे मृत मुलीचे नाव आहे. तर ऋषिकेश तानाजी शेरकर (वय, २५ रा. वळदगाव ) असे भावाचे नाव आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
याबाबत अधिक माहिती अशी की, नम्रताचे एका मुलावर प्रेम होते. त्यातूनच तिचे घरच्यांशी खटके उडत होते. यामुळे घरच्यांनी तिला शहागड येथून वळदगाव येथे चुलते तानाजी शेरकर यांच्याकडे पाठवले होते. दरम्यान सोमवारी( दि.६) चुलत भाऊ ऋषिकेश याने बाहेर फिरायला जाऊन येऊ असे सांगत नम्रतास दुचाकीवरून परिसरातील खवड्या डोंगर येथे आणले. यावेळी डोंगराच्या टोकावर असणा-या सर्वात अवघड जागेवर ऋषिकेशने तिला नेले. येथे गप्पा मारण्याचा बहाणा करत ऋषिकेशने बेसावध नम्रतास अचानक धक्का देऊन डोंगरावरुन खाली ढकलले.
तब्बल २०० फुट उंचावर खाली पडल्याने नम्रताचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी घटनेची माहिती देताच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह पोहेकॉ राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे आदींसह कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलीचा मृतदेह पोलिसांनी घाटी रुग्णालयात रवाना केला. पोलिसांनी आरोपी ऋषीकेश शेरकर यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.