रावेर शालीक महाजन । राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख उद्या जिल्ह्यात येत असून ते बोरखेडा येथील पिडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
बोरखेडा येथील हत्याकांड उघडकीस आले तेव्हा जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईत होते. मुंबईहून सायंकाळी घरी आल्यानंतर त्यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे आदी मान्यवर होते.
याप्रसंगी ना. पाटील म्हणाले की, रावेर येथील हत्याकांड हे अतिशय भयंकर या प्रकारातील आहे. पोलीस प्रशासनाने याचा तपास योग्य दिशेने सुरू केला आहे. या हत्याकांडाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तातडीने येथे दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अजून काहींची चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पिडीत कुटुंब हे अतिशय गरीब असून त्यांना तातडीने दोन लाख रूपयांची मदत देण्यात येत आहे. तर लवकरच शासनाच्या निकषांनुसार त्यांना मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी अॅड. उज्ज्वल निकम यांचे मार्गदर्शन घेऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची माहिती घेतली असल्याचेही ना. पाटील म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून ते उद्या जिल्ह्यात येत आहेत. ते बोरखेडा येथे पिडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याची माहिती देखील ना. पाटील यांनी याप्रसंगी दिली.