जळगाव प्रतिनिधी । बांधकाम क्षेत्रास लागणारी मूलभूत सामुग्री स्टील, सिमेंट, मजुरी, वाहतूक खर्च इत्यादींच्या किंमतीमध्ये दिवसागणिक होत असलेल्या वाढीमुळे बांधकाम खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा थेट परिणाम घर खरेदीदारांवर पडणार असून, घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांची ही कसोटीची वेळ आहे, अशी माहिती ‘क्रेडाई’जळगावचे अध्यक्ष हतीम अली, सचिव दीपक सराफ व सर्व पदाधिकारी दिली आहे.
सकल देशांतर्गत उत्पादनात महत्वाचा वाटा उचलणारे व जास्त रोजगार पुरविणारे म्हणून देशभरात बांधकाम क्षेत्र ओळखले जाते. आर्थिक विकासातील एक महत्वाचा घटक म्हणून ही बांधकाम क्षेत्राची ओळख आहे. करोना महामारी, लॉक डाऊन, बांधकाम मजुरांचे स्थलांतर, तसेच इंधन, स्टील, सिमेंट यांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या बांधकाम खर्चात प्रति चौरस फूट ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे.
सिमेंट चे दर प्रति गोणी २७५ ते २८० रुपयांवरून ३५० ते ४१० प्रति गोणी, स्टीलचे दर प्रति किलो ४० ते ४५ रुपयांवरून ६० ते ७० प्रति किलो झाले आहेत. पि.व्ही.सी पाईप व फिटिंग मध्ये ३० ते ४०% वाढ झाली आहे. डिझेल चे दर प्रति लिटर ६० रुपयांवरून १०२ प्रति लिटर भाव सुरु असून टाइल्सच्या दरातसुद्धा २० ते ३०% वाढ झाली आहे.
बांधकाम सामुग्रीच्या सर्व दरवाढीचा परिणाम घरबांधणीच्या प्रकल्पावर सातत्याने होत आहे. जास्त करून परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होईल असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे गृह खरेदीचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. राज्य व केंद्र सरकारने या मध्ये त्वरित लक्ष्य घालून सामान्य जनतेच्या हितासाठी, वरील बांधकाम सामुग्रीची होंत असलेली दरवाढ आटोक्यात आणावी अशी विनंतीही ‘क्रेडाई’जळगाव चे अध्यक्ष हतीम अली ,सचिव दीपक सराफ व सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.