जळगाव, प्रतिनिधी | बंजारा समाजाने आपल्या रूढी परंपरा जपल्या असून त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न देखील केले जात आहे. यात उद्या दूरदर्शनच्या सह्याद्रीवाहिनीवरून बंजारा नृत्याचे प्रेक्षपण करण्यात येणार असून हे नृत्य भडगाव तालुक्यातील बंजारा महिला सादर करणार आहेत.
होळी हा बंजारा समाजातील प्रमुख सण आहे. बंजारा समाजातील होळी नृत्य देशभरात प्रसिद्ध आहे. दरम्यान भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील गोर बंजारा समाजभूषण मोरसिंग राठोड यांनी रचलेल्या होळी गीतावर महिलांनी होळी नृत्य सादर केले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील या नृत्याचे चित्रीकरण झाले असून उद्या रविवारी ७ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सह्याद्री वाहिनीवर प्रसारण होणार आहे. पुनः प्रसारण शनिवारी १४ डिसेंबर रोजी होणार आहे. दूरचित्रवाणीवर प्रसारण होणार असल्याने महिला कलावंतांना आस लागून आहे. महिला कलावंतांमध्ये आनंदी वातावरण असून त्यांचे कौतुक देखील होत आहे.