फैजपूर (प्रतिनिधी) ‘थेंब अमृता’चा लोकसहभागातून जलसमृध्दीकडे या माध्यमातून रावेर व यावल तालुक्यात राबवण्यात आलेल्या जलक्रांती अभियानांतर्गत १५ नद्या व तीन नाले या ठिकाणी केल्या गेलेल्या कामांच्या माध्यमातून नऊ कोटी, ७८ लाख, ६२ हजार, ३७४ लिटर पाणी जिरेल अशी जलसंधारणाची कामे केली गेली आहेत. लोकसहभाग कसा इतिहास घडवून शकतो, याचे हे जिवंत उदाहरण ठरले आहे, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी आज (दि.३०) सावदा येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.
संत महंत आणि रावेर-यावलचे आमदार हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील “एक थेंब अमृताचा” या श्रमदानातून नद्या नाले खोलीकरण व सरळीकरण करण्याच्या मोहिमेला रावेर-यावल तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अत्यल्प पर्जन्यमानामुळे विहिरींची पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळेच प्रत्येक गावागावात जलव्यवस्थापनावर भर देऊन रावेर-यावल तालुका हा शासनाने डार्क झोन म्हणून गेल्या १० वर्षांपासून घोषित केलेला होता. या दोन्ही तालुक्यांचे अतिउपसा क्षेत्रात वर्गीकरण केले आहे, म्हणून येथे ‘थेंब अमृताचा’ हे अभियान दि.२ मे ते २ जुलै अशा दोन महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत झालेल्या कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर पोहचावा, यासाठी आज (दि.३०) पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. या अभियानातून १८ नद्या-नाले यांचे खोलीकरण व सरळीकरण करण्यासाठी २५५ चर व खड्डे करण्यात आले. अभियानासाठी लोकांनी स्वयंस्फूर्तीने स्वतः येऊन वर्गण्या दिल्या, त्यात ४८ लाख १० हजार २२८ रुपये वर्गणी जमा झाली असून त्यापैकी २० लाख ९४ हजार ७६७ रुपये पोकलॅंड व जे.सी.बी.च्या डिझेलवर खर्च करण्यात आले आहेत तर २७ लाख १५ हजार ७६१ रुपये शिल्लक आहेत. या रकमेची एक वर्षाची एफ. डी. जलक्रांती या नावाखाली करण्यात येणार आहे. ही रक्कम पुढील वर्षी बंधारे व पाणी जिरवा या कामांसाठी खर्च केली जाणार आहे. या अभियानाबरोबर वृक्षक्रांती अभियानाला सुरुवात करण्यात येणार असून १० हजार झाडे लोकांना दिली जाणार आहेत. यानंतर येत्या सात-आठ वर्षात आपल्याला त्यामुळे पाणी पातळीत फरक दिसणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी आ. हरिभाऊ जावळे, व.पु होले, स्वामींनारायण गुरुकुलचे संचालक पी.डी. पाटील, प्राचार्य संजय वाघूळदे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे हे उपस्थित होते.