जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून शनिवारी दुपारी मू.जे. महाविद्यालयात एका टोळीने आसोद्याचा विद्यार्थी मुकेश सपकाळे (वय २२) याच्या छातीत चॉपर खुपसून खून केला होता. याप्रकरणी आज दुपारी पाच आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मू.जे. महाविद्यालयात तरुणांमध्ये वाद झाला. यात एका टोळीतील जमावाने दोन भावंडांना बेदम मारहाण करून त्यातील आसोद्याचा विद्यार्थी मुकेश सपकाळे (वय २२) याच्या छातीत चॉपर खुपसून खून केला. शनिवारी दुपारी १ वाजता मू.जे.महाविद्यालयातील दुचाकी पार्किंगमध्ये ही घटना घडली होती. परंतू नंतर हा खून गँगवॉरमधून झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्र वेगाने फिरवीत पुण्यातून पाच आरोपींना अटक केली आहे.
मित्राच्या खोलीतून सिनेस्टाईल अटक
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक शनिवार रात्रीपासूनच आरोपींच्या मागावर होते. त्यानुसार सर्व आरोपी पुण्याला गेल्याची गुप्त खबर मिळाली.एलसीबीच्या पथकाने सापळा रचला. आंबेवडगाव भागातील सिंहगड रोड परिसरात आरोपी आपला कार्तिक चौधरी नामक मित्राच्या खोलीवर लपून बसले होते. एलसीबीच्या पथकाने सिनेस्टाईलरित्या झडप घालत अरुण सोनवणे, किरण हटकर याच्यासह पाच आरोपींना अटक केली आहे. एलसीबीच्या पथकात सपोनि सागर शिंपी,पोहेकॉ विजयसिंग पाटील, विनोद पाटील,अनिल देशमुख,किरण धनगर, चालक बारी यांचा समावेश होता. आज रात्री उशिरा आरोपींना घेऊन पथक जळगावात पोहोचणार आहे.