नागपूर येथे पुन्हा आढळल्या ऐतिहासिक तोफा

cannons

नागपूर, वृत्तसंस्था | राज्यात राजकीय पक्षांद्वारे एकमेकांवर टीकेच्या तोफा डागल्या जात असताना येथील कस्तुरचंद पार्कमध्ये (केपी) आज (दि.२८) पुन्हा एकदा दोन ब्रिटीशकालीन ऐतिहासिक तोफा आढळल्या आहेत. महिनाभराच्या अवधीत तोफा आढळण्याची ही दुसरी घटना असून प्रथमदर्शनी दोन्ही वेळा सापडलेल्या तोफा सारख्याच धाटणीच्या दिसून येत आहे.

 

गाजलेल्या राजकीय सभांचा साक्षीदार असलेल्या कस्तूरचंद पार्कवर ऐतिहासिक अशा या ब्रिटिशांच्या तोफा मिळाल्या आहेत. सध्या या मैदानावर महापालिकेद्वारे सांडपाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत नाली बनविण्याचे कार्य सुरू आहे. नालीचा मार्ग खोदत असताना बुधवारी रात्री अवघ्या दोन ते तीन फुटांवर साडेनऊ फूट लांब आकाराच्या दोन तोफ सापडल्या. त्यानुसार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्य पुरातत्व विभागाला कळवले होते.

गुरुवारी सकाळी राज्य पुरातत्व विभागाचा चमू आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोफांची पाहणी केली. जेसीबी उपलब्ध नसल्याने लगेच तोफा काढण्यात आल्या नाहीत. परंतु, तोफाचा दर्शनी भागावरून त्या यापूर्वीच्या तोफांप्रमाणचे ब्रिटीश धाटणीच्या आणि वजनदार असल्याचे दिसून आले आहे. केपीवर सध्या मेट्रोच्या कार्याशिवाय मैदानाचे सौंदर्यीकरण सुरू आहे. याचअंतर्गत मैदानावर साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी भूमिगत नाला तयार करण्यात येत आहे. त्याच कामांतर्गत सर्वात आधी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी चार तोफा आणि दोन मॉर्टल सापडले होते. त्या तोफांवर नमूद असलेल्या इंग्रजीतील ‘आर’ अक्षर आणि इंग्लडच्या राणीच्या मुकुटाच्या आकाराच्या चित्रावरून त्या रॉयल गन फॅक्टरीत तयार झालेल्या असाव्यात असा, अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Protected Content