अंध असूनही वीजबिल भरण्यात त्यांचा डोळसपणा..!

मलकापूर प्रतिनिधी । महावितरणच्या बुलढाणा मंडळा अंतर्गत येणाऱ्या मलकापूर विभागाच्या सिरसोडी या गावातील दिनकर सरदार हे दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असून स्वतः कार्यालयात येऊन विज बिल देयक भरले आहे. या कार्याचा महावितरणच्या बुलढाणा विभागाचे व्यवस्थापकीय व लेखा अधिकारी विकास बांबल यांनी शब्दांकनातून त्यांचे कौतुक केले आहे.

विषाची चव काय असते हे विचारायचे असेल तर भगवान शिवाला विचारावे लागेल, मिराबाईंना विचारले तर ती अमृत सांगेल, लॉकडाऊनचे दुःख काय असते? हे गरिबांना विचारा, श्रीमंतांना विचारले तर आनंदाचा उपभोगचं सांगतील.

अगदी त्याचप्रमाणे अंधाराचं दुःख काय असते? ते कायमची दृष्टी नसलेल्यां, आयुष्यात कायमचा अंधार असलेल्या दिव्यांगांना विचारावे लागेल. वीज देयकाच्या थकीत रकमेसाठी वीज कपात होईस्तोवर देयकाची रक्कम थकीत ठेवणाऱ्यांना ते कळणार नाही. आपल्या आयुष्यात जरी अंधार असला तरी माझ्या घरात अंधार होणार नाही याची काळजी घेत दृष्टी नसलेल्या दिनकर सरदारांनी आपले विजेचे थकीत देयक भरून आपली जबाबदारी पार पाडली.

महावितरणच्या बुलढाणा मंडळा अंतर्गत येणाऱ्या मलकापूर विभागाच्या सिरसोडी या गावातील दिनकर सरदार हे दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असून रेल्वे मध्ये किरकोळ विक्रीव्दारे आपला चारितार्थ कसाबसा चालवतात. टाळेबंदीमुळे बऱ्याच रेल्वे बंद असून असल्या-नसल्या रोजगारावर सुद्धा विपरीत परिणाम झालेला आहे. पण या परिस्थितीत देखील महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्याकडील थकित असलेले विजेचे देयक त्यांनी स्वतः कार्यालयात येऊन भरले.ज्या पद्धतीने दिनकर सरदार यांनी विज बिल देयक भरले आहे याबाबत वीज वितरण चे.  बुलढाणा मंडळ व्यवस्थापक वित्त व लेखाधिकारी विकास बांबल यांनी शब्दांकन करीत थकित वीज ग्राहकांना आपल्याकडे असलेले वीजबिल देयके भरण्याचे आवाहन देखील केले आहे.

 

Protected Content