जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ‘हिंदुत्व हाच आमचा श्वास’ असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील बोरनार येथील रमजान ईद आणि अक्षय तृतीयेचे औचित्य साधून सर्वधर्मीय सलोखा कार्यक्रमात ते बोलत होते.
मात्र आमचे हिंदुत्व हे इतरांचा द्वेष करायला शिकवत नाही. तर सर्व जाती-धर्मांमध्ये सलोखा शिकवते. इतरांनी आम्हाला यावरून धडे देण्याची गरज नाही. आज सर्वांना विकासासोबत शांतता हवी आहे. गावात शांती असेल तर हीच विकासाची नांदी असते असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील बोरनार येथे सर्वधर्मीय सलोखा कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्र्यांनी आपण मंत्री म्हणून राज्य व जिल्हा पातळीवर वेगाने कामे करत असतांना आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामांना प्राधान्य दिले असून आगामी काळात देखील याच तडफेने कामे होत राहतील अशी ग्वाही दिली. तर, काही राजकारणी दुहीची बिजे पेरत असली तरी याला थारा न देता सर्वांनी सलोखा कायम राखण्याचे आवाहन देखील पालकमंत्र्यांनी केले. तर याच कार्यक्रमात बोरनार ग्रामस्थांतर्फे पालकमंत्र्यांनी कोरोना काळात केलेले कार्य आणि त्यांच्या विकासाभिमुख वाटचालीबद्दल “आदर्श नेतृत्व ” या पुरस्काराने त्यांना सन्मानीत केले.
तालुक्यातील बोरनार येथे रमजान ईद आणि अक्षय तृतीयेचे औचित्य साधून सवधर्मीय सलोखा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ईकरा शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा माजी उपमहापौर करीम सालार, शिवसेना उपतालुका प्रमुख धोंडूभाऊ जगताप, मस्जीद ट्रस्टचे चेअरमन मुख्तार देशमुख, बिट्टू सालार, मजिद जकारिया, सरपंच कल्पनाताई चौधरी, उपसरपंच बापू थोरात, ग्रामपंचायत सदस्य मंगलाबाई मराठे, सखुबाई धनगर, मंदाबाई बडगुजर, पोलीस पाटील शेखर बडगुजर, अंगणवाडी सेविका शांताबाई चौधरी, मंदिर ट्रस्टचे चेअरमन सुरेश जैन डा विनायक वाणी, सरपंच विष्णू आप्पाचिंचोरे शिवसेना उप संघटक सुनिल बडगुजर नाना पाटील, समाधान धनगर, शगिर देशमुख गफ्फार पटेल, प्रकाश कुलकर्णी, विनोद न्हावी सुरेश कोळी, मोसिन पठाण शगिर पटेल , पुंडलिक कोळी, निलेश चौधरी , संभाजी भोई, इरफान सालार, रईसभाई, भीकन पठाण, अरूण पठाण, सुनील मराठे प्रमोद बडगुजर, यांच्यासह हिंदू-मुस्लीम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिरखुर्म्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतर मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात बोरनार ग्रास्थांतर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना आदर्श नेतृत्व या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. पालकमंत्र्यांनी कोरोनासारख्या अतिशय भयंकर आपत्तीत केलेले भरीव कार्य आणि विशेष करून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना आदर्श नेतृत्व म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला. एखाद्या ग्रामपंचायतीने व सर्वधर्मीय ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांना या प्रकारे पुरस्कार देण्याचा हा अतिशय दुर्मीळ प्रकार असून या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बोरनार येथे आमदार निधीसह अन्य निधीतून शादीखाना हॉलसाठी २५ लाख रूपयांचा निधी प्रदान केला असून यासाठी ६ हजार चौरस फुट जागा देणारे उपमहापौर करीम सालार यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मस्जीद ट्रस्टचे चेअरमन मुख्तार देशमुख यांनी केले. यात त्यांनी पालकमंत्र्यांच्या विकासाच्या व्हिजनचे तोंड भरून कौतुक केले. जळगावचे माजी उपमहापौर करीम सालार यांनी अतिशय सारगर्भ अशा शब्दांमध्ये पालकमंत्री म्हणजे आदर्श नेतृत्व असे प्रतिपादन केले. मंत्रीपदाची हवा डोक्यात न जाऊ देता सर्व धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली असल्याचे कौतुक त्यांनी केले.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून बोरनार गावाने अतिशय चांगल्या पध्दतीत सामाजिक सलोखा कायम राखल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, हिंदुत्व हाच आमचा श्वास आहे. यामुळे कुणी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आमचे हिंदुत्व हे इतरांचा द्वेष करायचे शिकवत नाही. सध्या भोंग्यांच्या विषयावरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न झाला असला तरी दोन्ही धर्मांमधील सुज्ञ नागरिकांमुळे हा डाव हाणून पाडण्यात आलेला आहे. नागरिकांनी या भेदभावाला कोणत्याही प्रकारचा थारा देता कामा नये असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोले मारले. ते म्हणाले की, जे आपल्या काकाला झाले नाहीत, ते जगाला काय होणार ? राज हे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले नसते ते संगीतकार झाले असते अशी टीका देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
लोकांना विकासासोबत शांतता हवी असल्याचे पालकमंत्री म्हणाले. राज्याचा पाणी पुरवठा मंत्री म्हणून आपण सर्वांना पाणी पाजत आहोत. मात्र इतर अर्थाने देखील आपण पाणी पाजण्यास सक्षम आहोत. तरूणांनी रोजगाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चालन हरीफ पटेल तर सतीश चौधरी यांनी आभार मानले.