पुणे- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुण्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली अहे. यंदाच्या मान्सूनमध्ये दोन वेळा पुणे शहरातील अनेक भाग पाण्यात गेले. त्यानंतर रविवारी ४ ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ४ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर पुणे शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून पुणे शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून शहराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. द्वारका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसले आहे. पहिल्या मजल्यावरचे लोक बाहेर जायला सुरूवात झाली आहे. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. द्वारका सोसायटी पूर्ण रिकामी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.