अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मारवड मंडळात १८ आणि १९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अचानकपणे पाऊस झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात तालुक्यातील कळमसरेसह पाडळसरे, शहापुर, तांदळी, नीम, गोवर्धन, मारवड खेडी, वासरे, बोहरा सह परिसरात जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. यात अनेक शेतांचे बांध व जलसंधारणची कामे फुटून नाल्यांना पूरस्थिती निर्माण होऊन,शेती सह शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाण्याने तुडुंब भरल्याने पिके पाण्याखाली आली आहेत.
काल रात्री जोराचा वारा, अचानक सुरु झालेल्या पावसाने जणु काही ढगफुटी झाली की काय? असा प्रश्न गावकरी करीत आहे. या आलेल्या पावसाने संपूर्ण शेती ही पाण्याखाली आली असून कपाशी, मका,ज्वारी, सोयाबीनसह आदी पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. ग्रामस्थांनी नुकसान भरपाईची मागणी करीत, शेतीच्या पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी बांधवानी केली आहे. मात्र नुकसान शेती पिकांचे नुकसान होऊनही शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मका, ज्वारी, सोयाबीन पीक कापणीवर आले आहे तर कापूस पीक वेचणी सुरु असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच जास्त पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.आता आलेले जेमतेम उत्पन्नही हातातून गेल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. १८ ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या पावसाने पिकांना कोंब फुटले असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. जबाबदार अधिकारी पंचनामा करण्याचे आदेश देत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पुढील महिन्यात विधान सभा निवडणूक असल्याने आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी मुंबईची वारी सुरु असल्याने तालुक्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असताना कोणताच भावी आमदार आता शेतकऱ्यांकडे पाहायला तयार नाही. मात्र गेल्या ६ महिन्यापासून तालुक्यात मतदारांच्या भेटी घेणारे आता मात्र पाहायला तयार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना जबाबदार अधिकारी जिओ टॅगिंगने नुकसान झालेल्या पिकांचे फोटो काढून पंचनामा करा. मात्र कुठलाच अधिकारी शेताच्या बांधापर्यंत पोहचायला तयार नाहीत.