पुढील पाच दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

hit

 

मुंबई (वृत्तसंस्था) हवामान खात्याकडून कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यासाठी आजचा दिवस (सोमवार, 1 एप्रिल) सोडून पुढच्या चार दिवसात, मध्य महाराष्ट्रासाठी पुढच्या तीन दिवसात, तर विदर्भासाठी पुढच्या पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे.

भर दुपारी रणरणत्या उन्हात तुम्ही घराबाहेर पडत असला, तर उन्हापासून आपला बचाव होईल, याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरासह राज्यात पारा वाढत असल्याचे निदर्शनास येते. पारा दोन दिवसांतही वाढलेला राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये 41 अंश, नागपूरमध्ये ४०, औरंगाबाद ३९, सोलापुरात ३९, अक्कलकोट ३८, बार्शी ३८, पिंपरी-चिंचवडमध्ये ३७, जळगाव ४२, नांदेड ४२, बीड ४२, यवतमाळ येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झालीय. त्यामुळे उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी नागरिकांनी अत्यंत गरजेचे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान, उन्हामुळे उकाडा असह्य होऊ लागला आहे.

Add Comment

Protected Content