मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशद्रोही दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असणार्या नवाब मलीक यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही अधिवेशनात आक्रमक मागणी करणार असल्याचे स्पष्ट करतांनाच विद्यमान राज्य सरकार हे दाऊदचे पाठीराखे असल्याचा घणाघाती आरोप आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.
उद्या सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, नवाब मलीक यांचा तातडीने राजीनामा घेण्याची आवश्यकता असतांनाही तसे झालेले नाही. दाऊद हा देशाचा सर्वात मोठा शत्रू असतांना त्याच्याशी हातमिळवणी करणारा व्यक्ती मंत्रीमंडळात राहू शकत नाही, आणी आम्ही त्यांना राहू देणार नसल्याचा इशारा फडणवीसांनी दिला.
फडणवीस यांनी विविध मुद्यांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात विरोधी पक्षांची मुस्कटदाबी सुरू असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मात्र त्यांच्या टिकेचा सर्व रोख हा राष्ट्रवादी कॉंग्रेसवर असल्याचेही दिसून आले.