भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील खंडाळा गावातील मराठी शाळेसमोर एका विवाहितेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री ९.३०च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील खंडाळा गावात १९ वर्षीय विवाहिता आपल्या परिसरात परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी २९ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास गावातील मराठी शाळेसमोर विवाहिता ही पायी जात असताना गावात राहणारा रितेश राजेंद्र महाजन रा. खंडाळा ता. भुसावळ याने महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. दरम्यान तिच्या पतीला जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर मंगळवारी ३० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता महिलेने भुसावळ तालुका पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी रितेश राजेंद्र महाजन यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुभान तडवी हे करीत आहे.