पोलिसांचा आम्हाला फसविण्याचा प्रयत्न- पिडीतेच्या भावाचा आरोप

लखनऊ । यूपी पोलिस संभ्रम निर्माण करणारे दावे करून आमच्या कुटुंबियांना फसविण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप हाथरस येथील पीडित तरूणीच्या भावाने केला आहे.

हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. यातच पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी हे फोनच्या माध्यमातून सातत्याने एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पीडित कुटुंब आणि आरोपीमध्ये तब्बल १०४ वेळा संभाषण झाले होते, असा दावा उत्तर प्रदेशपोलिसांनी केला आहे. यावर पिडीतेच्या भावाने पोलिसांवर आरोप केला आहे.

पिडीतेच्या भावाने याबाबत म्हटले आहे की, पोलीस आम्हाला आत अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. मारेकरी अतिशय चलाख आहेत. स्वत:ला वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतात. १० वर्षांपूर्वी आपण वडिलांसाठी एक सिम विकत घेतलं होतं मात्र त्यांचा फोन नेहमी हरवायचा. यासाठी आपण आपल्या आयडीने सिम विकत घेतलं. हा फोन नेहमीच घरीच असतो. गावातील सर्वांकडे, इतकेच काय पण ग्रामप्रमुखांकडेदेखील आमचा हा एकच नंबर आहे. या फोनचा उपयोग अधिकतर वडीलच करतात. मात्र मुख्य आरोपी संदीपशी कधीही संपर्क केला नसल्याचा दावा पिडीतेच्या भावाने केला

दरम्यान, पोलीस माझ्या बहिणीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. माझी बहीण शिकलेली नव्हती. तिला फोन नंबर देखील डायल करता येत नव्हता. तिला फोन उचलता देखील यायचा नाही. यामुळे फोन करण्याचा प्रश्‍नच येत नाही. पोलीस आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण आम्ही गरीब आहोत असा आरोप देखील करण्यात आला आहे.

Protected Content