चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चाळीसगाव ते नागद मार्गावरील हातले गावाजवळ आज सकाळी कार उलटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील संदीप ताराचंद बेदमुथा हे आपल्या कुटुंबासह एमएच ०४ एफएफ ९५२३ या क्रमांकाच्या कारने जात असतांना हातले गावाजवळ त्यांची कार उलटली. या अपघातात त्यांच्या पत्नी सौ. कांचन संदीप बेदमुथा (वय४७, रा. लक्ष्मीनगर चाळीसगाव) या जागीच ठार झाल्या. तर संदीप ताराचंद बेदमुथा यांच्यासह चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर अपघात हा सकाळी साधारणपणे नऊ वाजेच्या सुमारास झाला. संदीप बेदमुथा हे प्रतिष्ठीत व्यक्ती असून या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोक आणि आप्तांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यांच्यासह जखमी झालेल्यांवर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. या संदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.