पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. इंदापूर येथील या राजकीय प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. पाटील यांच्या रुपात पवार यांनी भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोडी मानली जात आहे. पाठिमागील काही दिवसांपासून या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा सुरु होत्या. मात्र, पाटील यांनी आज, 7 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
राज्याचे राजकारण आणि सहकार क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती तसेच, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांच्या महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील हे काही काळापासून भाजपमध्ये नाराज होते. खास करुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृतरित्या महायुतीमध्ये प्रवेश केल्यापासून ही नाराजी वाढली होती. पाटील हे इंदापूर येथून प्रदीर्घ काळ आमदार राहिले आहेत. मात्र, पाठीमागील सलग दोन वेळा त्यांना राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यातच आता भरणे हे अजित पवार गटाकडे गेले आहेत आणि महायुतीच्या जागाटवाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवदीला सुटण्याची शक्यता आहे.
सध्या ही जागा सत्ताधारी युतीतील भागीदार असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडे असल्याने, पक्ष त्यांना इंदापूर मतदारसंघात उतरवेल की नाही याबाबत अनेक महिने अनिश्चितता राहिल्यानंतर पाटील यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाटील यांच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला की, त्यांच्या उमेदवारीबाबत भाजपच्या अनिर्णयामुळे ते नाराज होते, ज्यामुळे शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. हर्षवर्धन पाटील यांनी राजकीय पक्ष बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही.