सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । ना. हरीभाऊ जावळे यांच्या विधासभेच्या तिकिटाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्मित केले जात असतांना आजच्या मेळाव्यातून त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे यांच्या तिकिटाबाबत संभ्रमाचे वातावरण पसरवण्यात आले आहेत. तर काही उमेदवारांनी भाजपकडून तिकिट मिळण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधून तयारीदेखील सुरू केली आहे. तथापि, ना. जावळे यांना आधीच वरिष्ठ पातळीवरून तयारीला लागण्यासाठी सांगण्यात आले असून आजच्या सावदा येथे झालेल्या मेळाव्यातूनही हेच चित्र स्पष्ट झाले आहे. आज राज्याचे अर्थ व वन मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी हरीभाऊंच्या कामाचे कौतुक करत त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. मेळाव्याप्रसंगी आलेल्या पावसाचा उल्लेख करून आगामी निवडणुकीसाठी हा शुभ संकेत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. याचप्रमाणे उर्वरित सर्व वक्त्यांनीदेखील हरीभाऊ जावळे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. या सर्व बाबी आगामी निवडणुकीत ना. जावळे यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचे अंगुलीनिर्देश करणार्या असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. अर्थात, यामुळे हरीभाऊंचे समर्थकदेखील सुखावल्याचे चित्र मेळाव्याप्रसंगी दिसून आले.